वीज बिलाच्या मुद्द्यावर मनसे आक्रमक; ऊर्जामंत्री नितीन राऊतांविरोधात दिली पोलिसात तक्रार

मुंबई । वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यावर मनसेने (MNS) आक्रमक पवित्रा घेतला आहे. वाढीव वीज बिलात नागरिकांना सवलत देण्यात येईल असे आश्वासन देऊन त्याची पूर्तता न केल्याबाबत राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांच्यासह ऊर्जा सचिव व बेस्ट महाव्यवस्थापक यांच्यावर आर्थिक फसवणुकीची तक्रार मनसेने शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात केली आहे. मनसेचे माहीम विधानसभा विभाग अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या कार्यकर्त्यांनी शिवाजी पार्क पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना तक्रार दाखल करून घेण्यासाठी निवेदन सादर केले.

कोरोना लॉकडाऊन काळात महावितरणकडून वीज मीटर रीडिंगसाठी प्रतिनिधि पाठविण्यात आले नाहीत. या काळात ग्राहकांना वीज वापरांपेक्षा अधिकचे बिल बेस्ट कडून पाठविण्यात आले होते. लॉकडाउनमुळे उत्पन्नाचे स्त्रोत बंद असताना वाढीव वीज बिल पाहून ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. तसेच ग्राहकांमध्ये संतापाची लाटही पसरली होती. याबाबत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यपाल कोशयारी यांची भेट घेत वीज बिलाबाबत चर्चा केली होती.

त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याकडे वाढीव बिललंबाबत तक्रारी मांडल्या होत्या तसेच बैठकी देखील घेण्यात आल्या या बैठकीत वीज बिलात कपात करून नगरिकांची दिवाळी गोड करू असे आश्वासन देण्यात आले होते असे यशवंत किल्लेदार यांनी सांगितले. सातत्याने याचा पाठपुरावा करूनही दिवाळी नंतर ऊर्जा मंत्र्यांनी घुमजाव केल्याचे मनसेचे म्हणणे आहे. वीज बिलात सवलत न देता मीटर रीडिंग नुसार बिल भरावेच लागेल असे सांगण्यात आले. त्यामुळे नागरिकांची एकप्रकारे आर्थिक फसवणूकच करण्यात आली. या कारणामुळेच तक्रार दाखल केली असल्याचे किल्लेदार यांनी सांगितले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.

You might also like