औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील विविध गावातील शेतकऱ्यांना बोलावून त्यांच्या समोर समृद्धी महामार्गाच्या संदर्भातील प्रकल्पाचे प्रेझेन्टेशन करण्यात आले. सध्या मुंबई ते नागपूर हायस्पीड बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या सर्वेक्षणाचे काम सुरू झालेले असून समृद्धी महामार्गाच्या दक्षिण बाजूने हा रेल्वे मार्ग असणार आहे. यामध्ये 60 टक्के जमीन समृद्धी महामार्गासाठी आणि उर्वरित 40 टक्के जमीन शेतकऱ्यांकडून अधिग्रहित केली जाणार आहे. संपादित जमिनीला एकच भाव ठरवावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
नागपूर मुंबई समृद्धी मार्ग प्रमाणेच ठाणे, नाशिक,अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बुलढाणा, वाशीम, अमरावती, वर्धा आणि नागपूर या दहा जिल्ह्यांमधून ही बुलेट ट्रेन जाणार आहे. यामध्ये रेल्वे प्रवासी क्षमता 750 असून प्रकल्पाची लांबी 739 किलोमीटर आहे यामध्ये 14 स्थानके असतील 28 तालुक्यातील 387 गावांमधील 1245.61 हेक्टर जमीन यासाठी दिली जाणार आहे. यामध्ये सर्वाधिक लांब बोगदा 8.36 किमीचा असणार आहे.
नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीला रेल्वे मंत्रालयाने देशातील आठ हाय स्पीड रेड कॉरिडॉर चा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम दिले असून त्यापैकी अहमदाबाद-मुंबई या प्रकल्पाचे काम प्रत्यक्षात सुरू आहे. नागपूर मुंबईसह इतर प्रकल्पांचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरू असल्याचे या कंपनीचे संयुक्त व्यवस्थापक अनिल शर्मा यांनी सांगितले.