हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : २७ जानेवारीपासून मुंबईत नाईट लाईफ लागू करण्याचा निर्णय नुकताच राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. हा निर्णय मंजूर करण्यासाठी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी महत्वाची भूमिका बजावली. त्यांच्याच पुढाकार हा निर्णय घेण्यात आला. आता या निर्णयावरून विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेची ढासळली असताना नाईट लाईफचा निर्णय कोणाचे बालहट्ट पुरवण्याठी घेतला आहे, असा प्रश्न उपस्थित करत दरेकरांनी सरकारवर निशाणा साधला.
सोमवारी रात्री कुर्ला येथे लोकमान्य टिळक टर्मिनस येथील महिलेवर सामूहिक बलात्काराची घटना घडली. दरेकर म्हणाले, एकीकडे मुंबईत कायदा व सुव्यवस्थेची स्थिती ढासळली असून मुंबईत बलात्कार,दरोडे,खून सारख्या घटना घडत असताना सामान्य जनेतेचे जीवन असुरक्षित असताना नाइट लाइफचा घाट कोणाचे बाल हट्ट पुरविण्यासाठी घेतला जात आहे.
मरिन ड्राईव्ह,वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, लोअर परळ आदी उच्चभ्रू वस्तीत नाइट लाइफ सुरु करण्याची सरकारची योजना असली तरीही यामुळे मुंबईच्या कायदा व सुव्यवस्थेवर ताण येणार आहे. महाराष्ट्र पोलिसांचे संख्याबळ आताच कमी आहे. पोलिसांवर आधीच नियमित कामाचा ताण-तणाव आहे, त्यातच नाइट लाइफ सुरु केल्यास पोलिसांच्या कामावर नक्कीच अधिक तणाव निर्माण होईल व त्याचा परिणाम मुंबईतील कायदा व सुव्यवस्थेवर होईल अशी चिंताही विरोधी पक्ष नेते दरेकर यांनी व्यक्त केली.