एकाच दिवसात मुंबई पोलीस दलातील ४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । कोरोनाशी सुरु असलेल्या युद्धात लढणाऱ्या खाकी वर्दीतील अनेक योद्ध्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. लॉकडाउन जाहीर झाल्यापासून कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस कर्मचारी अहोरात्र ड्युटी बजावत आहेत. पण हे करत असताना अनेकांवर मृत्यू ओढवला आहे. दरम्यान, शनिवारी एकाच दिवशी मुंबईत ४ पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईतील बोरिवली, वाकोला आणि दिंडोशी या पोलीस ठाण्यांमध्ये हे कर्मचारी तैनात होते. मुंबईत आतापर्यंत २६ पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

शुक्रवारी हाती आलेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात मागील २ दिवसात १२९ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे कोरोनाबाधित पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या ३ हजार ३८८ इतकी झाली आहे. आत्तापर्यंत राज्यात ४० पोलिसांचा करोनाची बाधा होऊन मृत्यू झाला आहे. तर ३ हजार ३८८ पैकी आत्तापर्यंत १९४५ पोलिसांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई याबाबत बोलताना म्हणाले, ‘लॉकडाउन जाहीर होऊन ३ महिने होत आले आहेत. पहिल्या दिवसापासून सर्वात जास्त ताण पोलीस दलावर आहे. १८ तास सलग तर काही वेळा २० तास पोलीस अधिकारी आणि कर्मचारी फिल्डवर काम करत आहेत. ५५ पेक्षा जास्त वय असणाऱ्या कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्येच काम करण्यास सांगत आहोत. ज्यांना व्याधी आहेत अशा पोलीस कर्मचाऱ्यांनाही गर्दीत पाठवलं जाऊ नये अशा सूचना आहेत. पण आपल्याकडे गरज आहे त्यापेक्षा कमी पोलीस उपलब्ध आहेत. त्यांचे कामाचे तास कमी व्हावेत यासाठी आपण होम गार्डची मदत घेत आहोत. पोलिसांवरील ताण कमी कसा करता येईल यासाठी प्रयत्न सुरु आहे,’ अशी माहिती शंभुराजे देसाई यांनी दिली.

‘मुंबईत संसर्ग वाढत असताना सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची जबाबादारी पोलीस दलावर आहे. कुठे गर्दी झाली तरी आधी पोलिसांना बोलावलं जातं. गर्दीच्या ठिकाणी पोलीस पोहोचत असतात यामुळे त्यांचा जास्त लोकांशी संपर्क येतो. कर्तव्य बजावत असताना पॉझिटिव्ह असणाऱ्या रुग्णांशी संपर्क आल्यावर त्यांचं निधन होणं खूप वाईट बाब आहे,’ अशी भावनाही शंभुराजे देसाई यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.
ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in

Leave a Comment