हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Mumbai Pune Expressway। भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार मागील काही वर्षांपासून पायाभूत सुविधांच्या विकासावर आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या (EVs) वापराला प्रोत्साहन देण्यावर भर देत आहे. मागील ,महिन्यात मुंबईतील अटल सेतूवर इलेक्ट्रिक वाहनांना टोल माफ करण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. आता महाराष्ट्रातील सर्वात महत्वाचा असलेल्या मुंबई पुणे एक्सप्रेसवे वर ८ इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन उभारण्याचा सरकारचा प्लॅन आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) एक्सप्रेसवेचे सर्वेक्षण करेल आणि हे ८ चार्जिंग स्टेशन कुठं कुठं उभारायचे ते ठरवेल. सरकारच्या या निर्णयामुळे मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरून धावणाऱ्या इलेक्ट्रिक गाड्यांचा प्रवास कोणतीही चिंता न होता होणार आहे.
MSRDC ने याबाबत एक प्रसिद्धीपत्रक जारी केलं आहे, त्यानुसार प्रत्येक स्टेशनवर एकाच वेळी अनेक वाहने चार्ज करण्यासाठी जागा आणि उपकरणे असतील. MSRDC चे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक राजेश पाटील यांनी म्हंटल कि, मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर (Mumbai Pune Expressway) चालवल्या जाणाऱ्या EV ची संख्या वाढत आहे. या वाढीला गाड्यांच्या संख्येमुळे या एक्सप्रेसवे वर चार्जिंग स्टेशन उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. रस्त्यावरील इलेक्ट्रिक वाहनांच्या वाढत्या संख्येला पाठिंबा देणे हाच या चार्जिंग स्टेशन उभारण्यामागचा मुख्य उद्देश आहे.
चार्जिंग संपले तरी टेन्शन नाही- Mumbai Pune Expressway
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या वाहन पोर्टलवरील आकडेवारीनुसार, आतापर्यंत 5.58 लाखांहून अधिक EV ची नोंदणी झाली आहे. महाराष्ट्रीयन मार्केट मध्ये इलेक्ट्रिक गाडयांना मोठं मार्केट आहे. परंतु मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर चार्जिंग सुविधा आणि पायाभूत सुविधांचा अभाव आहे. अचानक चार्जींग संपले तर गाडी बंद पडू शकते या भीतीने अनेकजण इच्छा असूनही इलेक्ट्रिक गाडी या हायवेवरून चालवू शकत नाही. त्यामुळे एमएसआरडीसीने इलेक्ट्रिक गाड्यांसाठी तातडीने चार्जिंग स्टेशन उभारण्याच्या दिशेने कार्यवाही सुरु केली आहे. त्यामुळे एकदा का ८ इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन्स उभारले कि मग चार्जिंग संपले तरी टेन्शन नाही.
दरम्यान, इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढविण्यासाठी, राज्य सरकारने मुंबई-पुणे एक्सप्रेसवे, समृद्धी महामार्ग आणि अटल सेतू यासारख्या प्रमुख आंतरशहर मार्गांवर इलेक्ट्रिक वाहनांसाठी टोल सूट जाहीर केली आहे. स्वच्छ, पर्यावरणपूरक वाहतुकीला प्रोत्साहन देणे आणि कार्बन-न्यूट्रल महामार्ग विकसित करण्याच्या दृष्टिकोनाला पाठिंबा देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.




