हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील अतिशय महत्वाचा महामार्ग असलेल्या मुंबई पुणे एक्सप्रेस वे (Mumbai Pune Expressway Accident) वर अपघाताचे सत्र सुरूच आहे. आजही भल्या पहाटे या महामार्गावर ३ वाहनांचा भीषण अपघात झाला. वेगात जाणारी कार, पाईप वाहून नेणारा ट्रक आणि कोंबड्याना घेऊन जाणारा टेम्पो ही ३ वाहने एकमेकांना धडकली. हा अपघात इतका भीषण होता कि यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला तर ८ जण गंभीर जखमी झाले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी कि, शुक्रवारी पहाटे सव्वाचार वाजेच्या सुमारास मुंबई-पुणे एक्सप्रेसवे (Mumbai Pune Expressway Accident) वरील खोपोलीजवळ बोरघाटात पाईप वाहून नेणारा ट्रक आणि कोंबड्या वाहून नेणारा टेम्पो आणि एक भरधाव वेगात असलेली कार यांची एकमेकांना धडक बसली. हि धडक इतकी जोरदार होती कि तिन्ही गाड्यांचा अक्षरशः चक्काचूर झाल्याचे पाहायला मिळाले. या भीषण अपघातात ३ जणांना आपला प्राण गमवावा लागला. तर ८ जण गंभीर जखमी झालेत. जखमींना उपचारासाठी कामोठे येथील एम जी एम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.
वाहतूक काही काळ ठप्प – Mumbai Pune Expressway Accident
या अपघातातील मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले. तिन्ही गाड्या रस्त्यावर आडव्या झाल्याने वाहतूक व्यवस्था काही काळ ठप्प पडली होती. मात्र पोलिसांकडून सध्या वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरु आहे. गेल्या काही महिन्यापासून मुंबई पुणे महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढतच चालले आहे. अनेक उपाययोजना करूनही अपघाताचे प्रमाण कमी होण्याचे नाव घेईन त्यामुळे हि मोठी चिंतेची बाब म्हणावी लागेल.