केंद्रीय रस्ते वाहतूक आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांचा देशाच्या प्रगतीमध्ये मोठा वाटा आहे. त्यातही वाहतूक व्यवस्था सुरळीत करणे आणि रस्ते उत्तम करणे यामध्ये देखील नितीन गडकरी यांचे प्लॅन गेम चेंजर ठरलेत यात शंका नाही. आता राज्याची राजधानी मुंबईमध्ये वाहतूक कोंडी पासून सुटका मिळावी यासाठी वेगवेगळे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. तसंच इतरही काही प्रकल्प मुंबईच्या प्रगतीसाठी सुरू आहेत. अशातच ऍडिशन म्हणून आता मुंबई ते नवी मुंबई विमानतळ अगदी 17 मिनिटात गाठता येणार आहे. त्यासाठी वॉटर टॅक्सीची सेवा सुरू करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. एका प्रचारसभेमध्ये गडकरी बोलत होते तेव्हा त्यांनी याबाबत भाष्य केले.
सुरु होणार वॉटर टॅक्सी
न्यूझीलंड, अमेरिका, फ्रान्स यासारख्या अनेक देशांमध्ये वॉटर टॅक्सी सार्वजनिक वाहतूक म्हणून वापरली जाते. आता भारतात प्रथमच वॉटर टॅक्सी सेवा 2020 मध्ये केरळ इथे सुरू झाली. याबाबत बोलताना नितीन गडकरी यांनी सांगितलं की नवी मुंबई विमानतळा जवळ जेट्टीची निर्मिती यापूर्वीच झाली आहे मुंबई आणि ठाणे परिसराला विशाल असा समुद्रकिनारा लाभला आहे. या समुद्राचा जलवाहतुकीसाठी वापर करून रस्त्यावरची गर्दी आणि प्रदूषण कमी करता येणार आहे. मुंबई- दिल्ली एक्सप्रेसवे पूर्ण झाल्यानंतर मुंबई -पुणे महामार्गावरील गर्दी देखील कमी होणार असल्याचं गडकरी यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना गडकरींनी ठाण्यातील वाहतूक कोंडीवर सुद्धा भाष्य केलं ते म्हणाले, ठाण्यातील वाहतूक कोंडी आणि प्रदूषणाचा प्रश्न कायम आहे या ठिकाणी उड्डाण पूल बांधून सुद्धा वाहतूक कोंडीची समस्या आहे. ठाणे, मुंबई, दिल्ली या शहरांची सर्वात मोठी समस्या म्हणजे वायू प्रदूषण आणि जलप्रदूषण आहे. मुंबई ठाणे शहराची प्रगती शैक्षणिक क्षेत्रामध्ये होत आहे त्यामुळे शिक्षण आणि रोजगारासाठी इथं लोकांचे लोंढे वाढत आहेत. या भागातच नव्हे सर्वत्र विकास झाला पाहिजे.
आतापर्यंत उत्तर प्रदेश मध्ये पाहिजे तसा रोजगार उपलब्ध झाला नाही. महाराष्ट्रात सर्व मोठे उद्योग येत आहेत 20,000 कोटींची गुंतवणूक संभाजीनगर मध्ये होते आहे. राज्य आणि प्रशासन कसे असावे आणि ते कसे चालवावे हे छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकण्यासारखे आहे परंतु गेल्या साठ वर्षात काँग्रेसच्या चुकीच्या धोरणांमुळे देशाचा विकास झाला नाही. अशी टीका देखील नितीन गडकरी यांनी या कार्यक्रमांमध्ये बोलताना केली आहे