हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईचे प्रतिष्ठित छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय (CSMVS) आता पुण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ‘मूव्हिंग म्युझियम’ किंवा ‘म्युझियम ऑन व्हील्स’ हा उपक्रम आता पुण्यात आणला आहे. पुण्यातील लोकांना संग्रहालयाचा अनुभव घेता यावा यासाठी संग्रहालयाची छोटे व्हर्जन फिरत्या बसेसमध्ये तयार करण्यात आले आहे.
‘म्युझियम ऑन व्हील्स’ हा यशवंतराव चव्हाण केंद्राचा उपक्रम आहे जो मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाच्या पुढाकारातून बारामती लोकसभा मतदारसंघात सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमांच्या माध्यमातून शनिवारी पुण्यातील धायरी परिसरातील डीएसके विश्व मार्केटिंग कार्यालय परिसर आणि मॅजेस्टिक व्हेनिस सोसायटी येथे दोन बसेस उभारण्यात आल्या.
यशवंतराव चव्हाण सेंटरच्या पुढाकारातून छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालय, मुंबई यांच्या माध्यमातून आपल्या बारामती लोकसभा मतदार संघात 'फिरते म्युझियम – Museum on Wheels' या उपक्रमाची सुरूवात करण्यात आली.@ybchavancentre pic.twitter.com/WIu98E1OSM
— Supriya Sule (@supriya_sule) February 18, 2023
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वास्तुसंग्रहालय हे भारतातील सर्वात प्रतिष्ठित कला आणि इतिहास संग्रहालयांपैकी एक आहे. हे UNESCO जागतिक वारसा स्थळ 100 वर्षे जुने आहे. आणि यामध्ये भारत आणि परदेशातील जवळपास 70,000 हून अधिक कलाकृती आहेत. यामध्ये इतिहासकालीन कलाकृतींपासून ते विविध आधुनिक कलाकृतींचा ही समावेश आहे.
महाशिवरात्रीच्या सुट्टीत म्युझियम ऑन व्हीलला लोकांचा मोठया प्रमाणात प्रतिसाद दिसला. विशेष करून शाळकरी मुले आणि त्यांच्या पालकांनी इंटरएक्टिव्ह डेमो किट, ऑडिओ-व्हिज्युअल संसाधने आणि इतर डिजिटल मीडिया टूल्सने सुसज्ज असलेल्या या बसेसमध्ये गर्दी केली होती. स्वतः सुप्रिया सुळे यांनी स्वतः मॅजेस्टिक व्हेनिस सोसायटीला भेट देऊन या उपक्रमाचे निरीक्षण केले. यावेळी खडकवासला (शहर) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष काका चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते, विद्यार्थी व त्यांचे पालक उपस्थित होते.