महाराष्ट्रात कौशल्य विकास आणि रोजगार निर्मितीचा कृती आराखडा तयार करण्याचे मुनगंटीवार यांचे निर्देश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । सतिश शिंदे

प्रगत देशांशी तुलना होईल असे काम करून सर्वाधिक रोजगारक्षम राज्यांच्या यादीत महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल झाले पाहिजे, त्यासाठी कौशल्य विकास, रोजगार व स्वयंरोजगारनिर्मितीचा वेग वाढवून यूएनडीपीच्या (युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रॅम) माध्यमातून महाराष्ट्रात कौशल्य विकास, रोजगार आणि स्वयंरोजगारनिर्मितीचा कृती आराखडा तयार करा, असे निर्देश अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज दिले.

सह्याद्री अतिथीगृहात यूएनडीपीच्या प्रतिनिधींसोबत आज अर्थमंत्र्यांनी चर्चा केली त्यावेळी ते बोलत होते. यूएनडीपीला २०१९ ते २०३० या कालावधीत भारतातील ५ राज्यांचा कौशल्य विकास आणि रोजगार निर्मितीचा कृती आराखडा तयार करायचा असून यामध्ये महाराष्ट्र, हरियाणा, ओरिसा, झारखंड आणि उत्तराखंड या राज्यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील विकास प्रकल्पांना या माध्यमातून कशाप्रकारे मदत करता येईल, याबाबत अर्थमंत्र्यांनी या शिष्टमंडळाशी चर्चा केली. यावेळी बोलताना श्री.मुनगंटीवार म्हणाले, १९३ देशात यूएनडीपी कार्यरत असून त्यांचा अनुभव त्यांनी महाराष्ट्राशी शेअर करावा, इतर देशांनी रोजगार आणि स्वयंरोजगार निर्मितिसाठी ज्या चांगल्या योजना सुरू केल्या आहेत, त्याची सविस्तर माहिती त्यांनी राज्याच्या वित्त व नियोजन विभागाला द्यावी. यूएनडीपीच्या तज्ज्ञ मंडळीनी महाराष्ट्राच्या हितासाठी, प्रगतीसाठी आणि विकासासाठी योगदान द्यावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्राचे व्हिजन डॉक्युमेंट २०३० व यूएनडीपीचे व्हिजन डॉक्यूमेंट यामध्ये सांगड घालून या व्हिजनला पुढच्या १० वर्षात कसे गाठता येईल याकडे लक्ष देण्याचे निर्देश त्यांनी दिले. त्याचबरोबर मानव विकास मिशन अंतर्गत स्थापन केलेल्या ॲक्शन रूमला बळकट करून त्यामध्ये युनाइटेड नेशनच्या १७ शास्वत विकासाच्या ध्येयांना साध्य करण्यासाठी कशा प्रकारे काम करता येईल याचा आरखड्यात समावेश करण्याचे निर्देशही अर्थमंत्र्यांनी यावेळी दिले.

बैठकीस नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव देबाशीष चक्रवर्ती, वित्त विभागाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा, यूरोपसह आशियामध्ये कार्यरत असलेले यूएनडीपी डेन्मार्कचे टीम लीडर जेकब सिमनसेन, यूएनडीपीचे टीम मेंबर भगवती प्रसाद पांडे (उत्तराखंड), रत्ना विश्वनाथन (सीनियर प्रोजेक्ट ऑफिसर यूएनडीपी), डॉ.राकेश कुमार (यूएनडीपी भारताचे संचालक), क्लाउडियो प्रोविडास (यूएनडीपी कंट्री डायरेक्टर बोलीविया), एलेक्स ओपरुननको (बैंकॉक रीजनल हेड), डॉ.मनीष पंत (हेल्थ एक्सपर्ट), क्लेमेंट चाउवेट(स्किल डेव्हलपमेंट हेड यूएनडीपी) उपस्थित होते.

Leave a Comment