महापालिकेने 1728 कोटी रुपयांतून दाखविले शहराच्या विकासाचे ‘स्वप्न’

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी गुरुवारी 2022-23 या वर्षासाठी अर्थसंकल्प सादर केला. 1728 कोटी 15 लाख 80 हजार रुपयांचा अर्थसंकल्प असून, 1726 कोटी 39 लाख 71 हजार रुपये अपेक्षित खर्च आहे. त्यामुळे एक कोटी 76 लाख नऊ हजार रुपये शिलकीचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले. विशेष म्हणजे, प्रशासक पांडेय यांनी सलग तिसऱ्या वर्षी अर्थसंकल्प सादर केला आहे. महापालिकेतर्फे शहरात 200 कोटी रुपयांचे रस्ते करणे, माजी नगरसेवकांना त्यांच्या वॉर्डात प्रत्येकी एक कोटी विकास निधी, महापुरुषांचे पुतळे, संशोधन केंद्र, मेल्ट्रॉन येथील नव्या संसर्गजन्य रोग चिकित्सा व निर्मूलन रुग्णालयासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे.

अर्थसंकल्प सादर करताना प्रशासक पांडेय म्हणाले, की 2021-22 या आर्थिक वर्षात कोरोना संसर्गामुळे नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य होते. आता तिसरी लाट ओसरल्यानंतर महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान स्मार्ट सिटी अभियानातून 40 प्रकल्प मार्गी लावल्याचा आनंद वाटतो. एक एप्रिलपासून मालमत्ता कर, पाणीपट्टी संकलन, तक्रार निवारण यासाठी ई-गव्हर्नन्स अंतर्गत विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. महापालिकेची कामे गतीने कशी होतील, यासाठी 30 दिवसांत अंदाजपत्रक मंजूर करून तातडीने निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली. येणारे आर्थिक वर्षे कोणत्याही नैसर्गिक संकटाविना जाईल, अशी अशा व्यक्त करतो, महापालिकेचे अपूर्ण कामे, प्रकल्प या आर्थिक वर्षात पूर्ण करण्याची हमी पांडेय यांनी यावेळी दिली.

पुढील आर्थिक वर्षात केल्या जाणाऱ्या कामांची माहिती त्यांनी दिली. घनकचरा व्यवस्थापनाअंतर्गत ट्रान्सफर स्टेशन उभारणे, शहराच्या सीमेवर प्रवेशद्वार उभारणे, शहाबाजार येथे कत्तलखाना विकसित करणे, मटन, चिकन व मासे विक्रेत्यांसाठी विविध आकाराचे स्टॉल्स विकसित करणे, महापालिकेच्या मालकीचे उर्वरित पेट्रोल विकसित करणे, कांचनवाडी, शहानूरमियॉं दर्गा येथे महापालिकेच्या खुल्या जागांवर व्यापारी संकुल बांधणे, सेंट्रल नाका येथे प्रशासकीय इमारत बांधणे, महापालिकेच्या विविध उद्यानांत मनोरंजन पार्क, साहसी खेळ बीओटी तत्त्वावर विकसित करणे, गरवारे क्रीडा संकुल येथे जलतरण तलाव विकसित करणे, यासह इतर कामे केली जातील, असे पांडेय यांनी सांगितले.

माजी नगरसेवकांसाठी 115 कोटी –
प्रत्येक वॉर्डासाठी एक कोटी रुपयांचा निधी देण्याचे प्रशासकांनी जाहीर केले होते. त्यानुसार माजी नगरसेवकांकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते. काही नगरसेवकांनी प्रस्ताव सादरही केले. प्रत्येक वॉर्डाला एक कोटी याप्रमाणे 115 कोटी रुपयांचा तरतूद करण्यात आली आहे.
रस्त्यांना प्राधान्य –
स्मार्ट सिटी अभियानातून 317 कोटींचे 111 रस्ते केले जाणार आहेत. त्यासोबतच महापालिकेने विकास योजनेतील 217 रस्त्यांसाठी 200 कोटी रुपयांची तरदूत केली आहे. जुलै-ऑगस्टच्या अखेरीस या रस्ते कामांना सुरुवात होईल, असे पांडेय यांनी सांगितले.
दुभाजकांसाठी 20 कोटी –
शहरात शासनाने शहरातील रस्त्यांसाठी अनुक्रमे 52, 100 व 152 कोटींचे अनुदान दिले आहे. या रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत; पण त्यात दुभाजकांची तरतूद नव्हती. अर्थसंकल्पात 20 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
दिव्यांगांसाठी 17 कोटी –
शहरातील दिव्यांगांसाठी 2022-23 या आर्थिक वर्षाकरिता 17 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या तरतुदीतून दिव्यांग व्यक्तीसाठी 18 कलमी कार्यक्रम राबविला जाणार आहे.
तीन नवे संशोधन केंद्रे होणार –
स्वातंत्र्यवीर सावरकर, छत्रपती शिवाजी महाराज व भगवान महावीर संशोधन केंद्र सुरू करण्यासाठी काही वर्षांपासून मागणी सुरू होती. त्यानुसार यंदाच्या अर्थसंकल्पात प्रत्येकी दोन कोटी याप्रमाणे सहा कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
बाबासाहेबांच्या पुतळ्याचे सौंदर्यीकरण –
भडकलगेट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची उंची वाढविण्यासोबतच सौंदर्यीकरण करण्याची मागणी होत आहे. त्यानुसार अर्थसंकल्पात दोन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. टीव्ही सेंटर येथे महात्मा बसवेश्‍वर यांचा पुतळा उभारण्यासाठी दीड कोटी, महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यासाठी एक कोटी, वामनदादा कर्डक यांच्या पुतळ्यासाठी 25 लाखांची तरतूद आहे.
353 कोटी प्रशासकीय खर्च –
2022-23 या आर्थिक वर्षात 353.35 कोटी रुपये प्रशासकीय खर्च होणार आहे. त्यात कर्मचाऱ्यांचे वेतन 241.93, आउटसोर्सिंगच्या कर्मचाऱ्यांचे वेतन 28.55 कोटी, कर्मचाऱ्यांचा वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती एक कोटी, इतर प्रशासकीय खर्च 14 कोटी, सेवानिवृत्ती वेतन 67.87 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

Leave a Comment