महापालिका काढणार 300 कोटींचे कर्ज

औरंगाबाद – औरंगाबाद महापालिकेला स्मार्ट सिटी प्रकल्पात आपल्या वाट्याचा निधी टाकायचा आहे. त्यामुळे हा हिस्सा टाकण्यासाठी महापालिकेने तीनशे कोटी रुपयांचे कर्ज घेण्याचा निर्णय घेतला आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पाचा हिस्सा वापरल्यानंतर उरलेला निधी विकास कामांसाठी वापरला जाणार आहे. याकरिता एशियन डेव्हलपमेंट बँक आणि कार्बन झिरो बाँडच्या विक्रीतून हे कर्ज मिळवण्यात येणार असल्याचे मनपा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी सांगितले.

महापालिकेचे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, स्मार्ट सिटी प्रकल्पांसाठी महापालिकेला एकूण 250 कोटी रुपयांचा हिस्सा टाकायचा आहे. यापूर्वी 68 कोटी रुपये टाकण्यात आले आहेत. महापालिकेने यापूर्वी दोनशे कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. सध्या महापालिका कर्जमुक्त आहे. त्यामुळे आता नव्याने 300 कोटी रुपयांचे कर्ज काढण्याचे ठरवले आहे. मनपा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी सांगितले की, मार्च महिन्यापर्यंत कर्जाची प्रक्रिया होईल. स्मार्ट सिटीचा हिस्सा काढल्यानंतर उर्वरीत रक्कम विकास कामांसाठी वापरली जाईल.

तसेच शहरातील सिटी बस सेवेत सध्या शंभर स्मार्ट बस आहेत. कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी आता महापालिका आणखी वीस बस खरेदी करणार आहे. या बस ऐतिहासिक स्थळे आणि वारसा स्थळांच्या मार्गावर चालवल्या जातील. नवीन पाणी पुरवठा योजना सोलारवर चालवण्याच्या दृष्टीने तज्ज्ञांशी चर्चा केली जाईल, अशी माहिती महापालिका प्रशासक पांडेय यांनी दिली.

You might also like