Tuesday, June 6, 2023

महापालिकेचा बेकायदा नळांवर ‘आक्रोश’

 

औरंगाबाद – शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करून नागरिकांना दिलासा देण्यासाठी महापालिकेने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. त्यात बेकायदा नळ कनेक्शन बंद करण्यासाठी विशेष पथक नियुक्त करण्यात आले असून, या पथकाने ज्या भागात नागरिकांच्‍या तक्रारी आहेत, तिथे बेकायदा नळांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. भावसिंगपुरा भागात एकाच पाइपलाइनवर हजारो बेकायदा नळ असल्याचे समोर आले होते. त्यानुसार मंगळवारपासून कारवाई सुरू करण्यात आली आहे. दिवसभरात नवयुग कॉलनी, भावसिंगपुरा भागातील 164 बेकायदा नळ तोडण्यात आल्याचे पथकप्रमुख तथा मुख्यलेखाधिकारी संतोष वाहुळे यांनी सांगितले.

 

उन्हाळा सुरू झाल्यापासून नागरिकांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. काही भागात आठ-नऊ दिवसांनंतर तर काही ठिकाणी चार-पाच दिवसांआड पाणीपुरवठा होत होता. विशेषतः सिडको-हडको भागातील नागरिक पाण्याविना त्रस्त होते. त्यामुळे पाण्यासाठी आंदोलने सुरू झाली. या आंदोलनाची दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेत पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव संजीव जायस्वाल यांना शहरात पाठविले. त्यानंतर प्रशासनाने विविध उपाययोजना हाती घेत शहरात येणाऱ्या पाण्यात वाढ केली आहे. सर्वांना समान पाणी देण्यासाठी नवे वेळापत्रक तयार करून पाच दिवसांआड म्हणजेच सहाव्या दिवाशी पाणी दिले जात आहे. एकीकडे थेंब थेंब पाण्यासाठी नागरिक त्रस्त असताना दुसरीकडे बेकायदा नळाद्वारे लाखो लिटर पाण्याची चोरी होत आहे. त्यामुळे बेकायदा नळ कनेक्शन तोडण्यासाठी मुख्यलेखाधिकारी संतोष वाहुळे यांचे पथक नियुक्त करण्यात आले आहे. ज्या भागात पाणीटंचाईची तीव्रता जास्त आहे, तिथे बेकायदा नळ तोडण्याची कारवाई केली जात आहे.

भावसिंगपुरा भागात पथकाने सर्वेक्षण केले असता, एकाच पाइपलाइनवर हजारो बेकायदा नळ कनेक्शन आढळून आले. त्यानुसार मंगळवारपासून बेकायदा नळांच्या विरोधात पोलिस बंदोबस्तात कारवाई सुरू करण्यात आली आहे. दिवसभरात जेसीबीच्या माध्यमातून 164 नळ तोडण्यात आल्याचे वाहुळे यांनी सांगितले.