महापालिकेची नोकरभरती लांबणीवर, सेवाभरती नियमांत सरकारने काढल्या त्रुटी

औरंगाबाद | राज्य सरकारने औरंगाबाद महापालिकेसह राज्यातील इतर महापालिकांचे आकृतीबंध मंजूर केले आहेत, पण सेवाभरती नियम मंजूर करताना राज्यातील सर्व महापालिकांमधील सर्व पदांसाठीची पात्रता सारखी असावी, असा निकष नगरविकास विभागाने ठरवला आहे. त्यादृष्टीने एकत्रित सेवाभरती नियमांची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

महापालिकेत आकृतीबंधाचे भिजत घोंगडे होते. पाच वर्षांपासून आकृतीबंधाच्या प्रस्तावावर काथ्याकुट केला जात होता. दोन वेळा सरकारने आकृतीबंध पालिका प्रशासनाकडे परत पाठवला. सरकारने काढलेल्या त्रुटींची पुर्तता केल्यावर अखेर तीन महिन्यांपूर्वी आकृतीबंध मंजूर झाला. आकृतीबंधासोबतच महापालिकेने नवीन सेवाभरती नियम सरकारच्या मंजुरीसाठी पाठवले होते. हे नियम मात्र सरकारने अद्याप मंजूर केले नाहीत. सेवाभरती नियमात सरकारने काही त्रुटी काढल्याची माहिती खुद्द प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी दिली. त्रुटींची पुर्तता करण्याचे काम सुरु आहे. त्रुटींची पुर्तता झाल्यावर सेवाभरती नियम पुन्हा सरकारकडे मंजुरीसाठी पाठवले जातील. सरकारची मंजुरी मिळाल्यावर पुढील कार्यवाही केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

नोकरभरती करण्यासाठी पालिकेला सेवाभरती नियमांच्या मंजुरीची गरज आहे. सरकारने हे नियम मंजूर केल्याशिवाय महापालिकेला नोकरभरती करता येत नाही. आकृतीबंध मंजूर झाल्यावर पालिका प्रशासनाने मे अखेरपर्यंत आवश्यक त्या पदांची भरती करण्याचे नियोजन केले होते. त्यामुळे कामात सुसूत्रता येईल, असे मानले जात होते. परंतु सेवाभरती नियमांची मंजुरी लांबणीवर पडल्यामुळे नोकरभरतीही आता लांबणीवर पडल्याचे स्पष्ट झाले आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

You might also like