औरंगाबाद | महापालिकेने आता पुढील आठवड्यात शहरातील बेघर व्यक्ती, भिकाऱ्यांचे लसीकरण करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी महापालिकेची पथके रस्त्यावर उतरली जाणार आहेत. या बेघर भिकाऱ्यांच्या नोंदणीसाठी स्वतंत्र वेबसाईट तयार केली जाणार आहे.
शहरात जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू आहे. शासनाकडून उपलब्ध होणाऱ्या लसींच्या साठयानुसार केंद्रावर लसीकरण केले जात आहे. नागरिकांना कोविन ॲपवर नोंदणी करून लसीकरणाची वेळ निश्चित करून दिली जात आहे. हे करताना आधार कार्डचा क्रमांक देणे बंधनकारक आहे. मात्र शहरातील बेघर व्यक्ती भिकारी रस्त्याच्या बाजूने दुकाने थाटून व्यवसाय करणारे छोटे व्यवसायिक यांच्याकडे कोणत्याही प्रकारची ओळखपत्र नसते. त्यांना कोविन ॲपवर जाऊन नोंदणी करता येत नाही त्यामुळे लसीकरणापासून ते सुटण्याची शक्यता असते. म्हणून महापालिकेने पुढील आठवड्यापासून अशा व्यक्तींच्या लसीकरणाची मोहीम हाती घेण्याचे ठरवले आहे.
बेघर भिकारी यांच्या लसीकरणासाठी एक स्वतंत्र पोर्टल तयार करून त्या माध्यमातून त्यांची नोंदणी केली जाईल. त्यासाठी पथके तयार केली जाणार आहेत. ही पथके रस्त्यावर उतरून ज्यांच्याकडे कोणतेही ओळखपत्र नाही अशा सर्वांची नोंदणी करून लसीकरण करणार आहेत. असे महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले.