अनैतिक संबंधातून चाकूने सपासप वार करून खून

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी |प्रथमेश गोंधळे 

संजयनगर येथील साईनगरमध्ये किरकोळ कारणावरून एकाचा गुंडाकडून निर्घृण खून करण्यात आला. पांडुरंग तुकाराम गलांडे (वय 39, रा. रामरहीम कॉलनी) असे मृताचे नाव आहे. शनिवारी रात्री सव्वाअकराच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी गुंड गबर्‍या ऊर्फ विश्‍वजित नामदेव माने (वय 29) याला अटक करण्यात आली आहे.  याबाबत संजयनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी गणेश मारुती कांबळे (वय 39, रा. साईनगर) याने फिर्याद दिली आहे.

पांडुरंग गलांडे कुटुंबासमवेत रामरहीम कॉलनीत राहत होते. त्यांचा पिकअप जीपचा व्यवसाय आहे. पांडुरंग गलांडे आणि गणेश कांबळे मित्र आहेत. शनिवारी रात्री गणेश कांबळे याच्या घरी मांसाहारी जेवणाचा बेत केला होता. गणेशने पांडुरंगला कुटुंबासह जेवणाचे निमंत्रण दिले होते. त्यामुळे गलांडे कुटुंबीयांना घेऊन गणेशच्या घरी जेवायला गेला होता. जेवण झाल्यानंतर ते घरात गप्पा मारत बसले होते. त्यावेळी संशयित गबर्‍या माने तेथे आला. गणेशच्या घरात पांडुरंगला पाहून त्याला राग आला. त्याने पांडुरंगला, तू इथे का आला आहेस, असे म्हणत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यावेळी पांडुरंगने गणेश माझा मानलेला भाचा आहे. त्याने जेवायला बोलावल्याने आल्याचे सांगितले. याचा गबर्‍या मानेला राग आला. त्याने काही कळायच्या आत पँटच्या मागील खिशातून चाकू काढून पांडुरंगच्या उजव्या मांडीवर वर्मी घाव घातला. त्यानंतर पांडुरंग तेथेच कोसळला. घाव इतका वर्मी होता की त्याच्या मांडीच्या मुख्य रक्तवाहिनीसह अन्य रक्तवाहिन्या फुटल्या. त्यानंतर तेथील लोकांनी त्याला तातडीने सांगलीच्या शासकीय रूग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पहाटे उत्तरीय तपासणी केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याबाबत संजयनगर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित गबर्‍या मानेला अटक करण्यात आली आहे.

संशयित रेकॉर्डवरील गुन्हेगार

संशयित गबर्‍या माने याच्यावर विश्रामबाग पोलिस ठाण्यात खून, खुनाचा प्रयत्न, गर्दी मारामारी असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. तो पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे सांगण्यात आले आहे. रात्री पांडुरंग गलांडेवर गबर्‍याने हल्ला केल्यानंतर तो पसार झाला होता. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांना तो बसस्थानक परिसरात असून तेथून पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी पथकाला कारवाईचे आदेश दिले. पथकाने सापळा रचून त्याला अटक केली. निरीक्षक पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक विशाल पाटील, निलेश कदम, चेतन महाजन, संदीप पाटील, संदीप नलवडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

अनैतिक संबंधातून कृत्याचा संशय

गुंड गबर्‍या माने याने नेमका कोणत्या कारणावरून पांडुरंग गलांडेचा खून केला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, अनैतिक संबंधाच्या कारणावरून गबर्‍याने त्याचा काटा काढला असावा, असा संशय पोलिसांना आहे. त्या दृष्टीने त्याच्याकडे सखोल चौकशी सुरू असल्याचे पोलिस उपअधीक्षक अशोक वीरकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Leave a Comment