चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा डोक्यात लोखंडी पार घालून खून

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

कोरेगाव तालुक्यातील नागझरी येथे मोलमजुरी करणाऱ्या पतीने चारित्र्याच्या संशयावरून पत्नीच्या डोक्यात पार मारुन निर्घृण खुन केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर नागझरीसह कोरेगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे. वैशाली बाबु जाधव (वय- 37) असे मृत पत्नीचे नाव असून बाबु बापु जाधव (वय 42 रा.नागझरी ता.कोरेगाव) असे संशयीत आरोपीचे नाव आहे.

याबाबत प्राथमिक माहिती अशी, मुळचे साताऱ्यातील असणारे बाबु जाधव हा मोलमजुरी करण्यासाठी काही महिन्यापासून नागझरीत येथे वास्तव्यास आला आहे. या दाम्पत्याना पाच मुले असून हे कुटुंब मिळेल, ते काम करून उदरनिर्वाह करीत होते. आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास चारित्र्याच्या संशयावरून बाबु व वैशाली या पती- पत्नीत वाद झाला. त्यातच बाबुने वैशालीच्या डोक्यात लोखंडी पार घातल्याने ती गंभीर जखमी झाली. त्यातच तिचा मृत्यू झाला.

त्यानंतर बाबुने स्वतःस ही मारहाण करून घेतल्याची माहिती मिळत आहे. घटनेची माहिती मिळताच रहिमतपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घटनास्थळी पोहचले आहेत. यावेळी लोकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. संशयीत आरोपीस अटक करून सातारा जिल्ह्य रुग्णालयात नेण्यात आले आहे. पुढील तपास रहिमतपूर पोलीस करत आहेत.