कोरेगाव | कुमठे (ता. कोरेगाव) गावच्या हद्दीत कॅनॉलनजीक धारदार शस्त्राने व लोखंडी पाईपने मारहाण केल्याने गोळेवाडीचे ग्रामपंचायत सदस्य मंगेश गणपत जाधव (वय- 35) यांचा खून झाल्याचे उघडकीस आले आहे. कोरेगाव पोलिसांनी अवघ्या 12 तासांत तपास करून दोन संशयित आरोपींना अटक केली आहे. केवळ उसने घेतलेले 31 हजार रुपये परत न दिल्याने खून केल्याचे संशयितांनी कारण सांगितले. या प्रकरणी देवानंद संजय गोरे (वय-18) व कमलेश मधुकर यादव (वय- 18, दोघेही रा. चिमणगाव, ता. कोरेगाव) अशी संशयितांची नावे आहेत. संशयितांना न्यायालयाने 10 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी दिलेली माहीती अशी, गोळेवाडी गावचे ग्रामपंचायत सदस्य मंगेश जाधव हे बुधवार दि. 4 ऑगस्टपासून बेपत्ता होते. यानंतर गुरूवारी दि. 5 रोजी कुमठे गावच्या हद्दीत धोम धरणाच्या बाजूला जाणाऱ्या रस्त्यावर मंगेश जाधव यांचा मृतदेह आढळून आला होता. यानंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली होती. याप्रकरणी कोरेगाव पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरूवात केली होती. डीवायएसपी गणेश केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि विशाल कदम व कर्मचाऱ्यांचे पथक तपास करत होते. या तपास पथकाला गोपनीय माहितीच्या आधारे गुन्ह्यात सहभागी असणाऱ्या देवानंद व कमलेश यांची नावे निष्पन्न झाली.
पोलिसांनी या दोघांनाही ताब्यात घेवून चौकशी केली. मंगेश जाधव याला देवानंद व मधुकर यांनी 31 हजार रूपये उसने दिले होते. मात्र, वारंवार पैसे मागूनही मंगेश पैसे परत देत नसल्याने मंगेशचा काटा काढण्याचे दोघांनी ठरवले. त्यानुसार दि. 4 रोजी दोघांनी मंगेश याला धोम कॅनॉलच्या बाजूला नेले. याठिकाणी त्याला लोखंडी पाईपने मारहाण करत धारदार शस्त्राने वार केले, अशी कबुली दोन्ही संशयितांनी दिली. या कारवाईत पोलिस निरीक्षक अर्चना शिंदे, सपोनि संजय बोंबले, गणेश कड, पोलिस उपनिरीक्षक प्रमोद सावंत, हवालदार कमलाकर कुंभार, प्रमोद चव्हाण, मिलिंद कुंभार, धनंजय दळवी, अमोल सपकाळ, सनी आवटे, साहिल झारी, सागर गायकवाड, सागर जाधव यांनी सहभाग घेतला.