सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
सातारा तालुक्यातील नागठाणे येथे एका महिलेचा खून झाल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. मालन बबन गायकवाड (वय 55, रा.नागठाणे, ता.सातारा) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. आषाढी एकादशी दिवशीच खुनाची घटना उघडकीस आल्याने नागठाणे गावात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा तालुक्यातील नागठाणे येथील जिल्हा परिषदेच्या केंद्रशाळेसमोर असणाऱ्या चाळीतील एका खोलीत ही घटना घडली असून या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी तत्काळ दाखल झाले. यावेळी बोरगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक डॉ. सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक वर्षा डाळिंबीकर व पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी तातडीने धाव घेत घटनेची माहिती घेतली.
या घडलेल्या घटनेची माहिती घेण्यासाठी सहायक पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे. तसेच त्यांनी घडलेल्या घटनेचा सखोल पद्धतीने तपास करावा, अशा सूचनाही यावेळी पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या. घटनास्थळी ठसे तज्ञांना पाचारण केले आहे. पोलिसांनी उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह नागठाणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवला असून, पुढील तपास सुरू आहे.