कुख्यात गुन्हेगार जम्याची भोसकून हत्त्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : पैशाच्या देवाण-घेवाणीतून कुख्यात गुन्हेगार जमीर खान शब्बीर खान ऊर्फ जम्या ( २५, रा. किराडपुरा) याचा धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून करण्यात आला. शहागंज मंडीतील चंद्रसागर जैन धर्मशाळेच्या समोर शुक्रवारी (४ जून) रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. जमीरचा साडू शोहेब खानच्या सांगण्यावरूनच हा खून झाल्याचे प्राथमिक तपासात निदर्शनास आले आहे. त्यामुळे त्याला ताब्यात घेण्यात आले.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जमीर खान याचा त्याच्या साडूसोबत पैशाच्या देवाण-घेवाणीतून वाद होता. त्यावरून त्यांच्यात अनेकदा खटकेही उडायचे. शुक्रवारी जमीर खान शहागंज मंडीतील चंद्रसागर जैन धर्मशाळेच्या समोरील इमारतीच्या शटरजवळ उभा होता. रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास जमीरचा साडू अन्य एकाला घेऊन तेथे आला. त्यांनी जमीरसोबत वाद घातला. त्यांचा वाद टोकाला जाताच साडूसोबतच्या व्यक्तीने धारदार शस्त्राने जमीरच्या छाती, पोट आणि मांडीवर वार केले. छातीवरील वार वर्मी लागल्याने जमीर जागेवरच कोसळला. त्यानंतर आरोपी तेथून पसार झाले.

शहागंजमध्ये सतत गर्दी असते. ही घटना घडली तेव्हाही तेथे बरेच लोक होते. त्यांनी एका रिक्षातून जमीरला घाटीत हलवले. सिटी चौक पोलिस ठाण्यासमोरून जाताना हा प्रकार पोलिसांच्या निदर्शनास आला. त्यानंतर सहायक पोलिस आयुक्त विवेक सराफ, पोलिस निरीक्षक संभाजी पवार, उपनिरीक्षक मुजगुले यांच्यासह गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक अजबसिंग जारवाल यांच्या पथकाने घटनास्थळाकडे धाव घेतली

पंधरा दिवसांत सहा खून…

शहरात खुनाचे सत्र सुरूच असून मागील पंधरा दिवसांतील हा सहावा खून आहे. एमआयडीसी वाळूज ठाण्याच्या हद्दीत २, छावणी १, सिडको १, एमआयडीसी सिडको १ आणि आता सिटी चौक ठाण्याच्या हद्दीत १ असे सहा खून झाले आहेत. यातील सिडको आणि एमआयडीसी वाळूज ठाण्याच्या हद्दीतील एक अशा दोन खुनांचा अद्याप उलगडादेखील झालेला नाही. खुनाची मालिका रोखणे आणि गुन्हेगारांना पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

घरफोडी, चोरीतील आरोपी…

जमीर खान ऊर्फ जम्या हा घरफोडीसह चोरीच्या गुन्ह्यातील सराईत आरोपी आहे. मात्र, काही दिवसांपासून त्याने घरफोडी, चोरी केली नव्हती, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

Leave a Comment