गुप्तधन शोधणाऱ्या तरूणाचा खून : सातारा, सांगली जिल्ह्यातील सहा जणांवर गुन्हा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

तासगाव | चार महिन्यांपूर्वी कवठेमहांकाळ तालुक्यातील नागज घाटात एकाचा खून झाला होता. पैसे घेऊनही गुप्तधन शोधले नाही म्हणून हा खून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला असून सातारा जिल्ह्यातील दोघांचा संशयित आरोपी म्हणून समावेश आहे. अवधूत सोपान शिंदे (वय- 29, रा. धामणी, ता. तासगाव) असे खून झालेल्या युवकाचे नाव असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.

या प्रकरणी वैभव नेताजी सकट, अमोल विठ्ठल कारंडे (दोघेही रा. आंबवडे, ता. खटाव, जि. सातारा), आनंदराव आत्माराम पाटील (वय- 57, रा. पाडळी, ता. तासगाव), तुषार बाळू कुंभार (वय- 28, रा. घोटी खुर्द, ता. तासगाव), लखन ठोंबरे (रा. पंचशीलनगर, विटा) व अण्णा (पूर्ण नाव समजू शकले नाही) या सहा जणांविरोधात कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आनंदराव पाटील, तुषार कुंभार व अमोल कारंडे या तिघांना अटक करून पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अवधूतचा खून करून अपघात झाल्याचा बनाव करण्यासाठी त्याचा मृतदेह व मोटारसायकल नागज घाटात टाकल्याचे स्पष्ट झाले आहे. गुप्तधन शोधण्यासाठी संशयित आनंदराव पाटील यांच्याकडून व इतरांकडून पैसे व सोने घेतले होते. परंतु गुप्तधन न शोधले नाही आणि पैसेही देत नसल्याच्या कारणावरून त्याचा खून केला असल्याचे संशयित आरोपींनी कबूल केले आहे. दि. 17 ऑक्टोबर 2021 रोजी अवधूत शिंदे यांचा मृतदेह नागज घाटात विटा-जत रस्त्यापासून सुमारे दहा फूट खाली सडलेल्या स्थितीत आढळून आला होता. त्याच्या मृतदेहाजवळ मोटारसायकल पडलेली असल्याने हा अपघात असावा, असा प्रथमदर्शनी अंदाज व्यक्त केला जात होता. नागजचे पोलिस पाटील दीपक शिंदे यांनी या घटनेची माहिती कवठेमहांकाळ पोलिसांना दिली. कवठेमहांकाळचे पोलिस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांनी गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची सूत्रे गतीने हलवली.

दरम्यान आनंदराव पाटील, तुषार कुंभार, लखन ठोंबरे, वैभव सकट, अमोल कारंडे व अन्य एकाने आठ ऑक्टोबरला रात्री अवधूतला खटाव तालुक्यातील आंबवडे गावाच्या माळावर नेऊन काठ्यांनी व लोखंडी पाईपने मारहाण करून त्याचा खून केला. संशयितांच्या कारमधून त्याचा मृतदेह नागज घाटात आणून टाकला. अवधूतचा खून केला नसून त्याचा अपघात झाला असल्याचा बनाव करण्यासाठी संशयितांनी त्याच्या मृतदेहाजवळ मोबाईल व बुलेट मोटारसायकल टाकून दिली होती. दरम्यान कवठेमहांकाळ पोलिसांनी चार महिन्यात या खुनाचा छडा लावून संशयितांच्या मुसक्या आवळल्या. तिघा संशयितांना अटक केली असून अन्य तीन संशयितांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिस निरीक्षक जितेंद्र शहाणे, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत निशानदार, शिवाजी करे यांच्या मार्गदर्शनाखाली कवठेमहांकाळ पोलिस या घटनेचा तपास करीत आहेत.

Leave a Comment