औरंगाबाद – शहरातील मिसरवाडीत भागात जुन्या वादातून एका युवकाचा खून केल्याची घटना शनिवारी मध्यरात्री उघडकीस आली आहे. हसन साजीद पटेल (वय 25, रा. मिसारवाडी) असे मृताचे नाव आहे. यामुळे पुन्हा एकदा शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
सिडको पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिसारवाडीत मध्यरात्री हसन पटेल याचा जुन्या वादातून 9 जणांनी खून केल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी मृतांचा भाऊ जावेद पटेल यांच्या तक्रारीवरून नऊ जनाच्या विरोधात सिडको पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये तालेब सुलतान चाऊस, सुलतान चाऊस, नासेर सुलतान चाऊस, अली सुलतान चाऊस, नासिर अब्दुल पटेल, राहील अन्सारी, मुसा शेख, रियाज उर्फ डॉन, आखेफ उर्फ गोल्डन युनूस कुरेशी यांचा समावेश आहे. मृत हसन हा प्लॉट खरेदी – विक्रीचा व्यवसाय करीत होता. संध्याकाळी 9 वाजता घरातून बाहेर पडला. रात्री 11 वाजता त्याच्यावर मिसारवाडीतील एक टपरीजवळ नऊ जणांनी हल्ला चढवला. यातील मुख्य आरोपी तालेब चाऊस याने हसनच्या पोटात चाकू खुपसला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
घटनास्थळाला पोलीस उपायुक्त दीपक गिर्हे, उज्वला वनकर, सहायक आयुक्त निशिकांत भुजबळ, पोलीस निरीक्षक संभाजी पवार, ड्युटी ऑफिसर उपनिरीक्षक कृष्णा घायाळ आदींनी भेट दिली. अधिक तपास दुय्यम निरीक्षक विनोद सलगरकर करीत आहेत.