प्रेयसीसोबत अनैतिक संबध सुरू असताना दरवाजा वाजवल्याने वृध्द महिलेचा खून

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

खटाव | येलमरवाडी (ता. खटाव) येथे रविवारी दि.12 रोजी रात्री 8 वाजता अनैतिक संबंधाला अडथळा ठरल्याने हिराबाई दगडू जगताप (वय- 70) या वृद्धेचा खून करण्यात आला आहे. याप्रकरणी वडूज पोलिसांनी संगीता गणपत देशमुख, तुळशीराम सखाराम बागल (दोघे रा. येलमरवाडी) यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी गौतम कृष्णा नलवडे (रा. येलमरवाडी, ता. खटाव) वडूज पोलिस ठाण्यात दिली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रविवारी रात्री 9.30 च्या सुमारास गावातील बाळकृष्ण पोळ यांच्या घरासमोर वृध्द महिला पडलेल्या काही लोकांना दिसल्या. स्थानिकांनी जवळ जाऊन पाहणी केली असता हिराबाई या मृतावस्थेत असल्याचे लक्षात आले. त्यानंतर स्थानिकांनी घटनेची माहिती हिराबाई यांचे भाचे गौतम नलवडे यांना कळवली. मृतदेह मावशीचा असल्याचे गाैतमने ओळखल्या नंतर वडूज पोलिसांना माहीती दिली.

सपोनि मालोजीराव देशमुख यांनी कर्मचार्‍यांसह घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रूग्णालय वडूज येथे पाठवून घटनेबाबत गावात चौकशीला सुरुवात केली. मृत हिराबाई या गावात भिक्षा मागून खात असल्याने त्यांचे कोणासोबत वैर असण्याची शक्यता नव्हती. त्यामुळे संशयितांचा शोध घेण्याबरोबरच गुन्ह्याची उकल करण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. दरम्यान, पोलिसांचे एक पथक तक्रार दाखल करून घेत होते तर दुसरे पथक येलमरवाडीत तळ ठोकून होते. यावेळी संशयित तुळशीराम बागल हा पोलिसांच्या तपासाबाबत संशयास्पद माहिती घेत होता.

सपोनि मालोजीराव देशमुख यांनी संशयित म्हणून बागल याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे कसून चौकशी केली. तो व तिची प्रेयसी संगिता यांच्याता अनैतिक संबंध सुरू असताना हिराबाई यांनी भिक्षा मागण्यासाठी वारंवार दरवाजा ठोठावला. त्यामुळे रागाच्या भरात डोक्यात दांडक्याने मारहाण केल्याचे सांगितले. यानंतर पोलिसांनी संगीता हिलाही अटक केली. सदरची कारवाई पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर अधीक्षक धीरज पाटील, डीवायएसपी डॉ. निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि मालोजीराव देशमुख, महिला पोलिस उपनिरीक्षक शीतल पालेकर यांच्यासह पथकाने केली.

Leave a Comment