Tuesday, June 6, 2023

धक्कादायक ! पैशांसाठी आई-बाबांसह चौघांची हत्या; मृतदेह घरातच पुरले

कोलकाता : वृत्तसंस्था – पश्चिम बंगालमधील मालदा या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका १९ वर्षीय तरुणाने त्याच्याच कुटुंबातील सदस्यांची हत्या केली आहे. या सगळ्यांची हत्या करून या तरुणाने यांचे मृतदेह घराजवळच्याच जमिनीखाली पुरले. या तरुणाने कौटुंबिक वादातून झालेल्या भांडणानंतर वडील, आई, बहीण आणि आजीची हत्या केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

आपल्या कुटुंबाची हत्या करुन घराजवळच्याच जमिनीत पुरणाऱ्या आरोपीचे नाव आसिफ मोहम्मद असे आहे. तो १९ वर्षांचा आहे. त्याने आपल्या कुटुंबातील आई-वडील, मोठी बहीण, आजी यांची हत्या केली आहे. या सगळ्यांची हत्या झाली तेव्हा मोठा भाऊ घरी नव्हता. तो काही कामासाठी बाहेर गेला होता. चार महिन्यांनंतर जेव्हा आरोपीचा मोठा भाऊ घरी आला तेव्हा त्याला या घटनेची माहिती मिळाली. यानंतर त्याने तातडीने मालदा पोलीस ठाण्यात धाव घेऊन आपल्या भावाने केलेल्या कृत्याची माहिती दिली. आरोपी भावाचे नाव असिफ मोहम्मद असे आहे.

पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने घटनास्थळी धाव घेतली.यानंतर पोलिसांनी घराजवळ खोदकाम केले असता त्यांना तिथे काही मृतदेह आढळले. यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याने आपला गुन्हा मान्य केला आहे. त्याने फेब्रुवारी २०२१ मध्ये हे खळबळजनक कृत्य केले होते. त्याने सगळ्यात अगोदर सगळ्यांच्या जेवणात गुंगीचं औषध टाकले. त्यानंतर सर्वांची गळा आवळून हत्या केली. यानंतर त्याने हे सर्व मृतदेह घराजवळच पुरले.