एकतर्फी प्रेमातून खून : कोरेगाव तालुक्यातील युवतीचा चाफळमध्ये भरदिवसा चाकूने गळा चिरला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटण | चाफळ येथील स्वागत कामानीजवळच सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास एकतर्फी प्रेमातून अठरा वर्षीय युवतीचा गळा चिरून खून केला. या घटनेमुळे चाफळ परिसरात तणाव निर्माण झाला आहे. चैतन्या बाळू बंडलकर (वय- 18, मूळ रा. वाठार किरोली, ता. कोरेगाव) असे खून झालेल्या युवतीचे नाव आहे. तर अनिकेत मोरे (वय – 22, रा. शिंरबे, ता. कोरेगाव) असे खून करणाऱ्या संशयित युवकाचे नाव आहे. युवतीचा खून केल्यानंतर अनिकेत पोलिसांत जावून हजर झाला असून त्याने गुन्ह्याची कबूली दिलेली आहे.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, चैतन्या हिची आई जिल्हा परिषदेच्या नानेगाव शाळेत शिक्षिका आहे. त्याची काही दिवसांपूर्वी येथील शाळेत बदली झाली आहे. त्यामुळे त्या मुलीसह चाफळला राहतात. संशयित अनिकेतचे चैतन्यावर एकतर्फी प्रेम होते. त्यातून तो तिला भेटायला येत होता. अनिकेतने मागील काही दिवसापूर्वी चैतन्याच्या आईची भेट घेवून लग्नासाठी मागणी केली होती. अनिकेत मजुरीवरील शेतातील कामे करतो.

अनिकेत आज गुरूवारी दि. 23 रोजी सकाळी चाफळ येथे दुचाकीवरून आला होता. येथील स्वागत कमानीजवळ तो चैतन्याला भेटला. त्यांच्यात काही बेलणे होण्यापूर्वीच त्याने तिचे तोंड दाबून त्याच्याकडे असलेल्या चाकूने तिचा गळा चिरला. त्यात ती जागीच ठार झाली. सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घडलेल्या घटनेने चाफळ गावात तणाव निर्माण झाला होता. खुनानंतर सशयित अनिकेत पोलिसांत हजर झाला आहे. त्यावेळी पोलिसांनी खुनाची माहिती समजल्यानंतर त्वरित त्याची माहिती वरिष्ठांना कळविण्यात आली असून कराडचे पोलिस उपाधीक्षक रणजीत पाटील, पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील, मल्हारपेठचे फौजदार अजित पाटील, संतोष पवार घटनास्थळी दाखल झाले आहेत. तेथे पोलिसांनी पंचानामा करण्यास सुरवात केली होती.

Leave a Comment