सोन्याच्या हव्यासापोटी चुलतीचा खून : जत तालुक्यातील संशयित चुलत पुतण्या पोलिसांच्या ताब्यात

सांगली | उमदी (ता. जत) येथील वृद्ध चुलतीचे अपहरण करून कर्नाटकातील कोलार येथे कोयत्याने वार करून तिची निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. सुसलाबाई राजाराम माने (वय- 74) असे खून झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे. या प्रकरणी चुलत पुतण्या संशयित आरोपी दादू आण्णासो माने (रा. उमदी) यास पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सुसलाबाई माने यांना गुरुवारी सायंकाळी चारच्या सुमारास चुलत पुतण्या दादू माने याने भाड्याच्या मोटारीतून विजयपूर येथे नेले. सोबत मोटर चालकही होता. दरम्यान दादूने विजयपूरमध्ये एक कोयता विकत घेतला. कोलार (कर्नाटक) येथे उतरून सुसलाबाई यांना पाहुण्याच्या घरी सोडून येतो, असे चालकाला थांबवून तो गेला. त्यानंतर दोन तासांनी तो परत आला. सुसलाबाई यांना पाहुण्याच्या घरी सोडून आलो असे त्याने चालकाला सांगितले. मात्र त्याच्या शर्टवर रक्ताचे डाग पडल्याचे दिसून आल्याने त्याला संशय आला. त्याने परत आल्यावर आपल्या मित्रांना ही माहिती दिली व त्यांनी चडचण येथील पोलिसांना माहिती दिली.

सुसलाबाई यांच्या जत येथील जावयाने त्या बेपत्ता झाल्याची तक्रार उमदी पोलिसांत दिली होती. उमदी पोलिसांनी तपास गतीने सुरू केला. मोटरचालकाला बोलावून घेऊन चौकशी केली. त्यानंतर शनिवारी कर्नाटकातील कोलार येथे जाऊन त्‍यांचा शोध घेतला असता, सुसलाबाई माने यांचा मृतदेह उसाच्या फडात सापडला. त्यांच्यावर कोयत्याने वार केल्याचे दिसून आले. संशयित दादू माने यास अटक केल्यानंतर तिच्याकडे असलेल्या सोन्याच्या हव्यासापोटी खून केल्याचे त्‍याने पोलिसांना कबुली दिली. याबाबत वृद्धेचे जावई गणेश साळुंखे यांनी उमदी पोलिसात फिर्याद दिली आहे. या खुनाचा छडा लावण्यासाठी पोलीस उपाधीक्षक रत्नाकर नवले यांच्या मार्गदर्शनाखाली उमदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर, श्रीशैल वळसंग, नितीन पलुस्कर यांनी तपास केला.

You might also like