महाबळेश्वर प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
महाविकास आघाडीतील तीन प्रमुख घटक पक्षांनी 11 ऑक्टोबर रोजी घोषित केलेल्या महाराष्ट्र बंदला महाबळेश्वर येथील शिवसेना, राष्ट्रवादी काॅंग्रेस व राष्ट्रीय काॅंग्रेस यांनी जाहीर पाठींबा दिला असुन लखीमपुर येथील घटनेच्या निषेधार्थ महाबळेश्वर शहरासह तालुका हा बंद राहणार असल्याची माहिती पंचायत समितीचे सभापती संजय गायकवाड यांनी दिली. या वेळी नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष अफजल सुतार व शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख राजेश कुंभारदरे हे देखिल उपस्थित होते.
महाराष्ट्र बंद संदर्भात चर्चा करून निर्णय घेण्यासाठी येथील साई रिजन्सी मध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काॅंग्रेस व राष्ट्रीय काॅंगेस या पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीसाठी तीनही पक्षाचे पदाधिकारी बैठकीसाठी उपस्थित होते. या बैठकी नंतर पंचायत समितीचे सभापती यांनी पत्रकार परीषद घेवुन बैठकीत झालेल्या निर्णयाची माहीती दिली.
ते म्हणाले की केंद्र शासनाने शेतकरी यांचा आवाज दाबण्यासाठी दबावतंत्राचा वापर केला. या दबावाला कोणी भिक घालत नाही हे पाहुन शेतकरी बांधवांच्या हत्याचे सत्र सुरू केले आहे. लखीमपुर येथील घटना याचाच प्रत्यय देत आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी महाबळेश्वर तालुका 11 ऑक्टोबर रोजी बंद करण्यात येणार आहे. महाबळेश्वर येथिल छ. शिवाजी महाराज चौकातुन तीनही पक्षांच्या प्रमुख पदाधिकारी यांची निषेध रॅली काढण्यात येणार आहे.
हि रॅली छ. शिवाजी महाराज चौकातुन बाजारपेठ मार्गे पोलिस ठाणे, सुभाषचंद्र बोस चौक, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौक, छ. संभाजी महराज वाहनतळ, बस स्थानक, पंचायत समिती मार्गे तहसिल कार्यालयात जाणार आहे. तेथे तहसिलदार सुषमा चौधरी पाटील यांना महाविकास आघाडीच्या वतीने निवेदन देण्यात येणार आहे असेही सभापती संजय गायकवाड यांनी स्पष्ट केले.
आज साई रिजन्सी येथे झालेल्या बैठकीला उपनगराध्यक्ष अफजल सुतार, माजी नगराध्यक्ष डी.एम.बावळेकर, किसनसेठ शिंदे, विमलताई पार्टे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राजेश कुंभारदरे, राष्ट्रवादी काॅंग्रेसचे शहराध्यक्ष दत्ताजी वाडकर, शिवसेना शहर प्रमुख महेश गुजर, राष्ट्रवादी काॅंग्रेसचे युवा शहराध्यक्ष रोहीत ढेबे, विशाल तोष्णीवाल, अर्बन बॅंकेचे अध्यक्ष सचिन धोत्रे, किराणा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष महेश कोमटी, युवासेनेचे उपजिल्हा प्रमुख सचिन वागदरे, माजी नगरसेवक संतोष शिंदे, राष्ट्रीय काॅंग्रेसचे नंदकुमार बावळेकर व सलिम बागवान, सुनिल साळुंखे, तौफिक पटवेकर, संजय ओंबळे, अरविंद वाईकर, प्रमोद गोंदकर आदी शहरातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.