सरकार व्यवस्थित चाललं असून पूर्ण 5 वर्ष टिकेल; शरद पवारांनी व्यक्त केला विश्वास

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना देखील काँग्रेस कडून सातत्याने स्वबळाची भाषा सुरू असल्याचे सरकार मध्ये सर्व आलबेल आहे की नाही अशी शंका निर्माण झाली होती. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हे सरकार अंत्यत व्यवस्थित चाललं असून आपली 5 वर्ष पूर्ण करेल असा विश्वास व्यक्त केला आहे.

शरद पवार म्हणाले, सरकार चालवताना काही प्रश्न असतात आणि त्यातुन मार्ग काढण्यासाठी काही यंत्रणा असावी म्हणून या तिन्ही पक्षातील नेत्यांवर याबाबत जबाबदारी सोपवली असल्याचं पवारांनी सांगितले. यामध्ये शिवसेने कडून एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, काँग्रेस कडून बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण व राष्ट्रवादी कडून अजित पवार आणि जयंत पाटील यांचा समावेश आहे असे पवार म्हणाले.

कोणत्याही प्रकारच्या धोरणात्मक प्रश्नासाठी या तीन पक्षातील हे 6 सहकारी एकत्र बसतात आणि चर्चा करून निर्णय घेत असतात त्यामुळे हे सरकार अंत्यत व्यवस्थित चाललं आहे त्यामुळे हे सरकार 5 वर्ष टिकेल याबाबत माझ्या मनात शंका नाही असे शरद पवारांनी म्हंटलं.

हे आम्ही सगळे एकत्र असताना सरकार मधील यांची भूमिका हा एक भाग आणि कोणत्याही राजकीय पक्षाला आपलं संघटन वाढण्याच्या कार्याला दुसरा भाग म्हणू शकतो असेही पवार म्हणाले. राजकीय पक्ष मग तो काँग्रेस असेल, शिवसेना असेल वा राष्ट्रवादी असेल आपला पक्ष वाढण्यासाठी प्रयत्न करणार हे स्वाभाविकच आहे. त्यामुळे हे सगळं करत असताना आमच्यात कुठेही गैरसमज नाही असेही शरद पवारांनी स्पष्ट केले