हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महायुती सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Mazi Ladki Bahin Yojana) सुरु करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना दर महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत करण्यात येणार आहे. परंतु आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मतदारांना खुश करण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात येत आहे. आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी तर या योजेनेबाबत मोठी घोषणा केली आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यास लाडक्या बहिणींना १५०० ऐवजी आम्ही ३००० देऊ असं संजय राऊतांनी म्हंटल आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
लाडकी बहीण योजना महायुती सरकारसाठी टर्निंग पॉईंट ठरेल का? असा सवाल संजय राऊत याना केला असता ते म्हणाले, अजिबात नाही. कदाचित त्यांच्यासाठी तो यू टर्न ठरेल. टर्निंग पॉईंट वगैरे काही नाही. महाराष्ट्रात आत्तापर्यंत महिलांसाठी अशा अनेक योजना आल्या आहेत. ही नवीन योजना नाही. त्यांनी फार मोठी क्रांती केली नाही. देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि मिंधे दीड हजार रुपये खिशातले देत नाहीत. लोकांच्या करातला हा पैसा आहे. महिलांनी या योजनेचा लाभ जरूर घेतला पाहिजे. परंतु राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचे सरकार आल्यास आम्ही महिलांना १५०० ऐवजी ३००० रुपये देऊ हा आमचा शब्द आहे असं संजय राऊत म्हणाले.
यावेळी संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला. महाविकास आघाडीचे सरकार आल्यास लाडकी बहीण योजना बंद होईल असं विधान फडणवीसांनी केलं होते त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, या महाराष्ट्रात ही योजना बंद, ती योजना बंद, हे सूडाचे राजकारण फडणवीसांनी सुरु केले आहे. आम्ही त्या पद्धतीचे राजकर्ते नाहीत. त्यांना आपलं सरकार जाईल ही भीती का वाटतं आहे? त्यामुळेच ते लोकांना धमक्या देतात असं प्रत्युत्तर राऊतांनी दिले. खरं तर देवेंद्र फडणवीस यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही. ज्या पद्धतीने पेशव्यांचे शेवटच्या काळात राज्य सुरु होतं, त्या पद्धतीने सध्या फडणवीस किंवा त्यांचे लोक काम करत आहेत. सर्व ठिकाणी अनागोंदी, अराजकता, लूटमार हे सर्व सुरु आहे. हे तिघेही घाशिराम कोतवाल आहेत. या तिघांच्या हातात महाराष्ट्र आहे. घाशिराम कोतवालांचा इतिहास काय, हे आम्ही महाराष्ट्राला लवकरच सांगू असा इशाराही संजय राऊतांनी शिंदे, फडणसवीस आणि अजित पवारांना दिला.