हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | माझे पती आत्महत्या करूच शकत नाहीत, असा दावा करत मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमला हिरेन यांनी याप्रकरणी सखोल चौकशीची मागणी केली आहे. दरम्यान, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी संपूर्ण प्रकरणाची एटीएस मार्फत चौकशी करण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे.
त्यांच्या पत्नीने दिलेल्या माहितीनुसार, आमची स्कॉर्पियो चोरी झाली होती. याबाबत रितसर विक्रोळी पोलीस ठाण्यात तक्रारही दिली. अशात कार सापडल्यानंतर माझ्या पतीने वेळोवेळी गुन्हे शाखेला सहकार्य केले. त्यांनी जेव्हा जेव्हा बोलावले तेव्हा माझे पती तेथे हजर झाले. गुरुवारीही कांदीवली गुन्हे शाखेतून तावडे नावाच्या व्यक्तीने कॉल करून भेटण्यासाठी घोडबंदर येथे बोलावले. पतीने त्यांना भेटून येतो असे सांगून घराबाहेर पडले. त्यानंतर रात्री १० नंतर त्यांचा मोबाइल बंद लागला. त्यांचा शोध लागला नाही म्हणून आम्ही पोलिसांकडे तक्रार दिली.
माझे पती कधी आत्महत्या करूच शकत नाहीत. मात्र,आत्महत्येबाबत अफवा पसरवल्या जात असून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे’, अशी मागणीही त्यांनी केली. विमला यांनी दिलेल्या माहितीतून आता नव्याने काही प्रश्न उपस्थित झाले आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’