हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे हे मुस्लिम असून त्यांच्या वडिलांचे नाव दाऊद असल्याचा दावा केला होता. तसेच त्यांनी समीर यांच्या पहिल्या लग्नाचा फोटो शेअर केला. त्यावर प्रतिक्रिया देताना मला माझी पत्नी किंवा नातेवाईक प्रेमाने दाऊद म्हणत असतील असा अजब दावा समीर वानखेडे यांच्या वडिलांनी केला आहे.
“माझी बायको मुस्लीम होती. कुणी प्रेमाने मला दाऊद देखील म्हणत असेल. कदाचित माझी पत्नी देखील बोलली असेल. घरात कुणाला आपण काही नाव देतो. तसं काही नाव घेतलं असेल. पण माझ्या सरकारी कागदपत्रांमध्ये नाव डी वानखेडे असंच लिहिलं आहे. माझ्या सर्विस बुकमध्ये ज्ञानदेव कचरू वानखेडे असं नाव लिहिलं आहे. हे माझं खरं नाव आहे”, असा दावा त्यांनी केला.
निकाहनाम्यावर समीर दाऊद वानखेडे असा उल्लेख आहे. याविषयी ज्ञानदेव वानखेडे यांनी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी समीरच्या आईने लग्नासाठी आग्रह धरला होता. मुस्लिम मुलीशी निकाह करायचा असेल तर दोघांचाही धर्म एकच असायला हवा. अन्यथा तो विवाह ग्राह्य धरला जात नाही. त्यामुळे समीरच्या आईने निकाहनाम्यावर त्याला सही करायला लावली. यामध्ये काहीही गैर नाही, असे ज्ञानदेव वानखेडे यांनी सांगितले.