नवी दिल्ली । म्यानमार लष्कराने ईशान्य भारतातील २२ बंडखोरांना शुक्रवारी दुपारी भारत सरकारच्या स्वाधीन केले. हे सर्व बंडखोर ईशान्य भारतातील मणिपूर आणि आसाम या दोन राज्यांशी संबंधित आहेत. या दोन राज्यातील सुरक्षा यंत्रणा बऱ्याच काळपासून या बंडखोरांच्या मागावर होत्या. विशेष विमानाने या बंडखोरांना भारतात आणण्यात आले असं वृत्त हिंदुस्थान टाइम्सने दिले आहे.
“म्यानमार सरकारने उचललेले हे मोठे पाऊल दोन्ही देशांमधील संबंध दृढ होत असल्याचे लक्षण आहे” असे एका अधिकाऱ्याने सांगितल्याचं हिंदुस्थान टाइम्सच्या वृत्तात म्हटलं आहे. म्यानमारमधून या बंडखोरांना घेऊन विमानाने उड्डाण केल्यानंतर अधिकाऱ्याने ही माहिती दिली. बंडखोरांना घेऊन येणारे हे विमान सर्वात आधी मणिपूरची राजधानी इम्फाळमध्ये थांबेल तेथील स्थानिक पोलिसांकडे त्या राज्यातील बंडखोरांना सोपवलं जाईल. त्यानंतर हे विमान आसाममधील गुवाहाटी शहरात उतरणार आणि तेथील स्थानिक पोलिसांकडे उरलेले आसाममधील बंडखोरांना सोपवलं जाईल.
“म्यानमार सरकारने प्रथमच ईशान्य भारतातील बंडखोर गटाच्या नेत्यांना ताब्यात देण्याची भारताची विनंती मान्य केली आहे” असे अधिकाऱ्याने सांगितले. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या नेतृत्वाखाली हे संपूर्ण ऑपरेशन पार पडले. दोन्ही देशांमध्ये इंटेलिजन्स आणि संरक्षण सहकार्य दृढ होत असल्याचे हे लक्षण आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”