धक्कादायक ! अविवाहित इसमाची घरात रहस्यमयरित्या हत्या

गडचिरोली : हॅलो महाराष्ट्र – गडचिरोलीमधील गजबजलेल्या फुले वार्डात एका अविवाहित तरुणाची त्याच्याच घरात रहस्यमयरित्या हत्या करण्यात आली आहे. हि घटना आज सकाळी उघडकीस आली. मृत व्यक्तीचे नाव दुर्योधन रायपुरे असे आहे. रायपुरे हे अविवाहित असून घरात एकटेच राहात होते. त्यांचा पार्टनरशिपमध्ये प्लॉटिंगचा व्यवसाय होता.

दुर्योधन रायपुरे यांना समाजकार्याची आवड असल्याने 4 वर्षापूर्वी लोकांच्या आग्रहास्तव त्यांनी नगर परिषदेची निवडणूकदेखील लढली होती. घरालगतच राहणाऱ्या भावांच्या कुटुंबियांकडून रायपुरे यांना जेवण आणून दिले जात होते. आज सकाळी त्यांचा मृतदेह आढळून आला.

त्यांच्या अंगावर धारदार शस्त्राने वार केल्याच्या खूणा आहेत. मृतदेहाच्या शेजारी एक काठी आणि अनोळखी चप्पलही सापडली आहे. या घटनेची माहिती मिळताच एसडीपीओ प्रणिल गिल्डा, ठाणेदार प्रमोद बाणबले यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. श्वानपथकाने आरमोरी मार्गाकडील शेतापर्यंतचा रस्ता दाखवला. त्यामुळे आरोपी तेथून एखाद्या वाहनाने पसार झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

You might also like