हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शेकापचे ज्येष्ठ नेते आणि रयत शिक्षण संस्थेचे माजी चेअरमन प्रा. एन डी पाटील हे आपल्या दमदार आणि कृतिशील कार्यासाठी ओळखले जात होते. पुरोगामी विचाराचे एन डी पाटील हे किती कृतिशील होते आणि त्यांना विद्यार्थी चळवळीची किती जाण होती याचे एक उदाहरण आणि तो खास प्रसंग आम्ही आज आपणांस सांगणार आहोत.
रयत शिक्षण संस्थेवर पूर्वीपासूनच पुरोगामी विचारांचा प्रभाव आहे. रयतेच्या शाळेत घडणारा प्रत्तेक विद्यार्थी शाहू, फुले, आंबेडकर विचारांनी प्रेरित झालेला असतो असा इतिहास आहे. राष्ट्रीयतेच्या भावनेसोबतच सर्वधर्मभावाची भावनाही रयतेच्या विद्यार्थ्यांमध्ये वाढीस लागण्याकरता रयतसेवक नेहमीच प्रयत्नशील असतात. रयत शिक्षण संस्थेच्या आजवरच्या पदाधिकार्यांनी याकरता विशेष लक्ष दिलं आहे. डाॅ. एन. डी. पाटील यांचा असाच एक किस्सा आम्ही आज आपल्याला सांगणार आहोत.
पूर्वीच्या काळात रयत शिक्षण संस्थेच्या प्रत्येक शाळेत गणेशोत्सव उत्साहात साजरा होत होता. मात्र 1995 रोजी वडगाव येथील शाळेचे तत्कालीन शिक्षक डॉ. सुधीर कुंभार यांनी त्यावेळी रयत शिक्षण संस्थेत चेअरमन असलेल्या डाॅ. एन. डी. पाटील यांना एक पत्र लिहिले. या पत्रातून त्यांनी रयतेच्या शाळांत गणेशोत्सव साजरा न करण्याचं आवाहन एन. डी. पाटील यांना केलं.
सुधीर कुंभार यांनी लिहिलेले पत्र खालीलप्रमाणे :
रयत शिक्षण संस्थेचा इतिहास पहाता आपली संस्था धर्मनिरपेक्षता माननारी आहे. म. फुले, रा. शाहू महाराज, गाडगे महाराज, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वैचारिक पायावर चाललेली व कर्मवीरांच्या तत्वज्ञानावर प्रगती करणारी अशी आपल्या संस्थेची जनमानसात प्रतिमा आहे.
या संस्थेच्या अनेक शाळांत गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. इतर धर्मियांचे सण त्याच महिन्यात असूनही लक्षात घेतले जात नाहीत. आपल्या सद्सद्विवेक बुद्धीस हे पटेल की शाळांच्या आवारात धर्म, जात, भाषा, पंथ यात भेद नसावा. आोण एकतर इतर सर्व धर्माबाबत उदारमतवादी धोरणाचे पालन शाखांना व सेवकांना करावयास लावा अथवा ही अती उत्सव प्रियता थांबवा.
या उत्सवातून शालेय विद्यार्थ्यांना राष्ट्रीय एकात्मता, सांस्कृतिक रक्षण, धर्मनिरपेक्षाता समजेल / त्यांच्यातील धर्माधर्मांतील भेद कमी करण्याचा हा प्रयत्न शाळाद्वारे होतो असे आोले मत असल्यास त्यास दुर्दैव म्हणावे लागेल. असे म्हणतात की फॅसीसमची चाल एकेका पावलाची असते. मजबूत पाय रोवून पुढे सरकण्याची असते. त्यावर तेथल्या तेथेच लढले, विरोध केला तरच चाल रोखता येते. अशा प्रकारचे Slow Poisoning रयत कडून थांबेल अशी अपेक्षा. नवी पिढी विज्ञाननिष्ठ घडवूया. आपला आशावादी मानवतावादी सुधीर कुंभार.
सुधीर कुंभार यांचे पत्र एन. डी. पाटील यांना मिळाल्यानंतर त्यावर त्यांनी लगेच पाऊल उचलले. एन डी पाटील हे व्यक्तीच मुळात कृतिशील आणि गतिशील होते. त्यांना चळवळीतील कार्यकर्त्यांची जाण होती. एन डी पाटील यांनी कायम कृतीला महत्त्व दिले. त्यांनी तात्काळ परिपत्रक काढत रयतच्या सर्व शाळांना पत्र पाठवले आणि इथून पुढे शाळेत गणपतीची मूर्ती बसवायची नाही असा आदेश दिला. त्याकाळापासून ते आजपर्यंत रयत शिक्षण संस्थेच्या कोणत्याही शाळेत गणपतीची मूर्ती बसवली जात नाही.