हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजकाल आपण सर्वच जण पैसे काढण्यासाठी बँकेत रांग न लावता थेट एटीएम (ATM) मध्ये जातात. आजवर आपण एटीएममधून पैसे काढताना नोटा फाटक्या आल्या, कमी पैसे आले किंवा पैसे अडकले अशा अनेक समस्यांना सामोरे गेला असेल. मात्र नागपुरात एक असं एटीएम आहे ज्यामध्ये 1000 रुपये काढले असता मशीन मधून चक्क 1600 रुपये निघत आहेत, तर 500 रुपये काढले तर 1100 रुपये मिळत आहेत. एटीम मधून जास्तीचे पैसे मिळत आहेत हे कळताच ग्राहकांनी एटीएम मशीन बाहेर तोबा गर्दी केली. मात्र नक्की घडतंय का हे उघडकीस येताच सदर एटीएम बंद करण्यात आलं आणि जी काही तांत्रिक अडचण होती ती दूर करण्यात आली. मात्र तोपर्यंत अनेकांनी जास्तीचे पैसे काढत आपले खिसे भरून घेतले.
नेमकं घडलं काय?
सदर घटना हि ५ सप्टेंबरची आहे. नागपूरमधील खापरखेडा येथील अॅक्सेस बँकेच्या एटीएममध्ये हा विचित्र प्रकार घडला. एका व्यक्तीने ५०० रुपये काढल्यानंतर एटीएम मधून त्याला ११०० रुपये मिळाले, तर दुसऱ्या व्यक्तीने १००० रुपये काढताच मशीन मधून १६०० रुपये आले. म्हणजेच प्रत्येक व्यवहारामागे ६०० रुपये जास्त येत होते. एकाकडून दुसऱ्याला आणि दुसर्याकडून तिसऱ्याला असं वाऱ्यासारखी बातमी पसरली आणि काही क्षणातच पैसे काढण्यासाठी अनेकांनी एटीएम बाहेर गर्दी केली. या तांत्रिक बिघाडामुळे एटीएम मशीन मधून जास्तीचे पैसे येत होते, मशिनमध्ये पैशांच्या ट्रेमध्ये नोटा भरताना तांत्रिक चूक झाल्या होत्या आणि लोक याचा फायदा घेत पैसे काढत होते.
मात्र खापरखेडा येथील स्थानिक नागरिक अरुण महाजन यांना हा सगळा प्रकार लक्षात आल्यावर त्यांनी तातडीने स्थानिक पोलीस आणि संबंधित बँकेला कळवले. तेव्हा दुपारी एटीएम बंद करून दुरूस्ती करण्यात आली. मात्र तोपर्यंत तब्बल 3 लाख रुपयांपेक्षा अधिक पैसे एटीएम मधून काढण्यात आले होते. त्यामुळे बँकेला मोठं नुकसान सहन करावे लागले. त्या सुज्ञ नागरिकाने वेळीच हा प्रकार समोर आणला नसता तर बँकेला आणखी मोठ्या अडचणींना आणि नुकसानीला सामोरे जावं लागलं असते हे मात्र नक्की…