नागपूर : हॅलो महाराष्ट्र – नागपूरमध्ये वृद्ध दाम्पत्याबाबत एक विचित्र घटना घडली आहे. यामध्ये बँकेत पैसे काढण्यासाठी गेलेल्या वृद्ध दाम्पत्याला चोरांनी लुटले आहे. एमआयडीसी परिसरातील एसबीआय बँकेतून 5 लाख रुपयांची रोकड पिशवीत भरून नेताना पार्किंग रस्त्यावरच दोन बाईकस्वारांनी त्यांच्या हातातील पिशवी हिसकावून हिंगणा मार्गाकडे पळ काढला. हि घटना गुरुवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास घडली आहे. हि घटना त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. याच सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) March 4, 2022
काय आहे नेमके प्रकरण ?
मीना आणि शिवप्रसाद सुखदेव विश्वकर्मा हे दाम्पत्य नागपुरातील यशोदा नगर, हिंगणा रोड परिसरात राहतात. शिवप्रसाद हे राज्य राखीव पोलीस दलातील सेवानिवृत्त सहा. पोलीस उपनिरीक्षक आहेत. घटनेच्या दिवशी हे वृद्ध दांपत्य घराच्या बांधकामासाठी स्कुटरने एसबीआय बँकेत पैसे काढण्यासाठी गेले होते. बँकेतून 5 लाख रुपये काढल्यानंतर शिवप्रसाद यांनी ती पिशवी आपल्या पत्नीच्या हातात दिली. यानंतर शिवप्रसाद हे बँकेच्या बाहेर रस्त्यावर ठेवलेली स्कुटर सुरू करीत असताना मागून बाईकवर दोन आरोपी आले आणि त्यांनी मीना यांच्या हातातील ती पिशवी हिसकावून पळून गेले. त्या पिशवीमध्ये एकूण पाच लाख रुपये, बँकेचे पासबूक आणि मोबाइल फोन होता.
या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश बेसरकर आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. आरोपी हे घटनास्थळावरून हिंगणा मार्गाकडे गेल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलीस उपायुक्त लोहित मतानी, सहा पोलीस आयुक्त प्रवीण तेजाळे यांनी सुद्धा घटनास्थळा ची पाहणी केली. आरोपी हे बँकेमधूनच या वृद्ध दांपत्यावर पाळत ठेवून होते असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.त्या वृद्ध दांपत्याने केलेल्या वर्णनानुसार तसेच सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.