हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला समजला जाणारा नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपाला धक्का बसला आहे. पहिल्या पाचही फेरीमध्ये भाजपाची पिछेहाट आहे. महाविकास आघाडीनं भाजपाच्या गडाला सुरुंग लावत जोरदार मुसंडी मारली आहे. नागपूर मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित वंजारी हे विजयी झाले आहेत. वंजारी यांनी पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतली होती. भाजपाचे संदीप जोशी हे दुसऱ्या क्रमांकावर राहिले.
नागपूर पदवीधर निवडणुकीमध्ये आज झालेल्या मतमोजणीच्या पाचव्या फेरीअखेर १ लक्ष ३३ हजार ५३ मतांची मोजणी पूर्ण झाली. तथापि, पसंतीक्रमाच्या या निवडणुकीमध्ये अपेक्षित असणारा ६० हजार ७४७चा कोटा कोणताही उमेदवार पूर्ण करू शकला नाही. अभिजित गोविंदराव वंजारी एकूण मते ५५ हजार ९४७, संदीप जोशी एकूण मते ४१ हजार५४०, अतुल कुमार खोब्रागडे ८ हजार४९९, नितेश कराळे ६ हजार८८९ मते मिळाली. विजयासाठी निश्चित केलेला मतांचा कोटा पूर्ण न करू शकल्यामुळे या निवडणुकीतील मतमोजणीचा भाग क्रमांक २ सुरु करण्यात आला.यानुसार वंजारी यांना विजयी घोषित करण्यात आले. सकाळी 9.30 ला ते विजयी प्रमाणपत्र घेण्यास मतदान केंद्रावर जाणार आहेत.
नागपूर मतदारसंघ हा नेहमीच भारतीय जनता पक्षाचा पारंपरिक मतदारसंघ राहिला असून गेल्या अनेक वर्षांपासून इथे भाजपची ताकद राहिली आहे. परंतु आता मात्र महाविकास आघाडीच्या माध्यमातून भाजपच्या या गडाला देखील सुरुंग लावण्यात आला आहे. राज्यातील महाविकास आघाडीतील एकी भाजपाला नक्कीच जड जात आहे हे मात्र नक्की
औरंगाबादमधूनन सतीश चव्हाण यांची विजयाची हॅटट्रिक
औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून सलग दोन वेळा विजयी ठरलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सतीश चव्हाण यांनी विजयाची हॅटट्रिक साधली आहे. महाविकास आघाडीचे सतीश चव्हाण पुन्हा एकदा विजयी झाले आहेत. सतीश चव्हाण यांना तब्बल ११६६३८ मते मिळाली आहेत. तर भाजपाच्या शिरीष बोराळकर यांना ५८७४३ मतांवर समाधान मानावं लागलं आहे