Nagpur Metro Second Phase | मेट्रो ही सध्या प्रत्येक महत्वाच्या शहरात सुरु केली जात आहे. मेट्रो प्रवासामुळे प्रमुख शहरात होणाऱ्या वाहतूक कोंडीला आळा घातला जात आहे आणि त्यामुळे प्रवाश्यांचा प्रवास हा अधिक सोयीचा व कमी वेळेत पूर्ण होत आहे. आपल्या महाराष्ट्रात मुंबई, पुणे आणि नागपूर या ३ महत्वाच्या शहरांत मेट्रो रेल्वेचा विस्तार होत आहे. यातील उपराजधानी असलेल्या नागपूर मध्ये सध्या एकूण 40 किलोमीटरचे मेट्रोचे जाळे असून आता मेट्रोचा दुसरा टप्पा हा एकूण 43 किलोमीटरचा असणार आहे.
2027 मध्ये होईल पूर्ण
केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी लोकसभेत नागपूर येथे मेट्रोचा दुसरा टप्पा (Nagpur Metro Second Phase) पूर्ण होण्यास 2027 हे वर्ष उजाडेल अशी माहिती दिली आहे. रामटेक लोकसभा मतदारसंघाचे खासदार कृपाल तुमाने यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर उत्तर देताना केंद्रीय मंत्री बोलत होते. ते म्हणाले कि, 2017 च्या कायद्यानुसार केंद्र सरकारला जेव्हा राज्य सरकारकडून प्रस्ताव सादर केला जातो, तेव्हा प्रस्तावाची व्यवहार्यता आणि संसाधनांची उपलब्धता यावर अवलंबून शहरे किंवा शहरी भागातील मेट्रो रेल्वेच्या प्रस्तावांसाठी आर्थिक मदतीचा विचार केला जातो.
कसा असेल नागपूर मेट्रो टप्पा 2- Nagpur Metro Second Phase
नागपूर मेट्रोचा दुसरा टप्पा हा मिहान ते एमआयडीसीईएसआर, ऑटोमोटिव्ह चौक ते कन्हान नदी, लोकमान्य नगर ते हिंगणा, प्रजापती नगर ते ट्रांसपोर्ट नगर असा आहे. या टप्प्यासाठी तब्बल 6 हजार 708 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या दुसऱ्या टप्प्याच्या निर्मितीमुळे शहराच्या वाहतूक सुविधेत वाढ होणार आहे. तसेच नागपूरच्या विकासात सुद्धा भर पडणार आहे. त्यामुळे ही मेट्रो नागपूर करांसाठी अतिशय महत्वाची आहे.