पीआयबी वृत्तसंस्था । नागपूरच्या मिहान विशेष औद्योगिक क्षेत्रामध्ये (सेझ) ‘टाल’ या विमान कंपनीने निर्मिती चालू केली असून, बोईंग या एयरक्राफ्ट निर्मिती करणाऱ्या कंपनीला २५,००० फ्लोर बीमचा पुरवठा करून या कंपनीने एक विक्रम स्थापित केला आहे. नागपूरचे एव्हिएशन मॅन्युफॅक्चरिंग हबचे स्वप्न यामुळे अधिक बळकट होईल, असा आशावाद केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग व जहाजबांधणी आणि केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी याप्रसंगी व्यक्त केला.
‘टाल’ या टाटा उद्योग समूहाच्या एयरोस्पेस व संरक्षण क्षेत्रातील कंपनीतर्फे त्यांच्या मिहान येथील प्रकल्पातून 25 हजार ऍडव्हान्स कंपोझिट फ्लोर बीम (ए.सी.एफ.बी.) या एयरक्राफ्ट निर्मितीसाठी लागणाऱ्या पार्टची रवानगी बोंईग एयरक्राफ्ट कंपनीला आज करण्यात आली, यावेळी आयोजित कार्यक्रमाप्रसंगी मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते.
‘टाल’ कंपनीसाठी मिहानमध्ये जागा संपादन करण्यास शासनाने पुढाकार घेतला व टाटा समुहाने त्याला सकारात्मक प्रतिसाद देत आपला प्रकल्प मिहानमध्ये चालू केला. या प्रकल्पात स्थानिक युवक काम करत आहेत, ही बाब अभिमानास्पद असल्याचे सांगून गडकरी यांनी टाल कंपनीला मिहानमध्ये विस्तार करण्याचे सुचविले.
आय.आय.आय.टी, आय.आय.एम, एन.एल.यू. , सिंबायोसिस या सारख्या शैक्षणिक संस्थामूळे नागपूर हे शैक्षणिक हब म्हणून उदयास आले असून येथे कुशल व प्रशिक्षित मनुष्यबळाची वाणवा नाही. टाल कंपनीच्या प्रकल्पातही 90 टक्के नागपूरच्या स्थानिकांना भरतीमध्ये प्राधान्य द्यावे, असे गडकरींनी यावेळी सांगितले.
राज्य सरकारने मिहानमधील कंपन्याना कमी दरात वीज उपलब्ध करून दिली असल्याने मिहानमध्ये औद्योगिक प्रकल्पांना चालना मिळत असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. टाल कंपनीचे अध्यक्ष विजय सिंग, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वन राज्यमंत्री डॉ. परिणय फुके, महापौर नंदा जिचकार, बोईंग इंडियाचे अध्यक्ष सलिल गुप्ते या प्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते.