हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Nagpur To Gondia New Expressway। विदर्भातील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र सरकारने नागपूर-गोंदिया प्रवेश द्रुतगती महामार्ग प्रकल्पाच्या आखणीस तसेच याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून करण्यास मान्यता दिली आहे. काल पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. नागपूर ते गोंदिया अंतर १६२.५ किलोमीटर लांबीचे असून या नव्या महामार्गासाठी तब्बल ३,१६२.१८ कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. या महामार्गामुळे पूर्व विदर्भातील वाहतूक आणि दळणवळणाला चालना मिळणार आहे. तसेच प्रवाशांच्या वेळेचीही मोठी बचत होणार आहे.
कसा असेल नवा एक्सप्रेसवे – Nagpur To Gondia New Expressway
सध्या नागपूरहून गोंदियाला जायचं म्हंटल तर ३ तासांपेक्षा जास्त वेळ लागत आहे. परंतु या नव्या एक्सप्रेस वे मुळे नागपूर ते गोंदिया अंतर सव्वा तासांपर्यंत कमी होईल, कारण नवीन एक्सप्रेसवे च्या निर्मितीमुळे सुमारे १५ किलोमीटर अंतर कमी होणार आहे. हा मार्ग नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील १० तालुक्यांमधील ११५ गावांमधून जाईल. त्यामुळे ग्रामीण भागातील वाहतुकीलाही बळ मिळणार आहे. नागपूर गोंदिया एक्सप्रेसवे (Nagpur To Gondia New Expressway) प्रकल्पाअंतर्गत २६ उड्डाणपूल, ८ प्राण्यांचे अंडरपास, १५ मोठे पूल, ६३ लहान पूल आणि ७१ कल्व्हर्ट क्रॉसिंगचा समावेश आहे. ज्यामध्ये गवसी, पाचगाव, ठाणे, रोटरी, पांजरा, पालडोंगरी, लोहारी आणि सावरी येथे ८ इंटरचेंज असतील.
हा प्रकल्प म्हणजे समृद्धी महामार्गाचाच पुढचा टप्पा असेल.. समृद्धी महामार्ग हा मुंबई ते नागपूर पर्यंत आहे.. आता हाच रस्ता पुढे गोंदिया पर्यंत विस्तारला जाईल. अधिकाऱ्यांनी म्हंटल कि, नागपूर ते गोंदिया या नव्या एक्सप्रेसवे मुळे या परिसरातील प्रादेशिक गतिशीलता तर वाढेलच, याशिवाय लोकांचा प्रवास जलद होईलमी पूर्व विदर्भांतील पायाभूत सुविधांचे जाळे मजबूत होईल. आणि नागपूर व गोंदिया या दोन्ही जिल्ह्यातील औद्योगिक आणि शहरी विकासाचा पाया रचला जाईल. या रस्ते प्रकल्पाच्या (Nagpur To Gondia New Expressway) भूसंपादनास प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून तब्बल ३,१६२.१८ कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.




