हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| औरंगजेबाच्या कबरीवरील दोन गटात झालेल्या वादामुळे सोमवारी नागपूरमध्ये (Nagpur) मोठा हिंसाचार घडल्याचे समोर आले आहे. दोन गटात दगडफेक झाल्यामुळे तब्बल 35 जण जखमी झाले आहेत. या सर्व प्रकरणानंतर आज नागपूरमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या सर्व घटनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी विधानसभेत निवेदन सादर केले आहे. ज्यात, ही हिंसाचाराची घटना पूर्वनियोजित असल्याचे दिसून येते, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
विधानसभेत निवेदन सादर करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “काल सकाळी ११.३० वाजता विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांनी कबर हटाव यासाठी आंदोलन केले. जी प्रतिकात्मक कबर जाळण्यात आली; त्यात एक धार्मिक मेसेज लिहिलाय अशी अफवा पसरवली. ८० लोकांचा जमाव होता. त्यांनी दगडफेक केली. एका पोलीस अधिकाऱ्यावर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला. काही लोकांनी जाणीवपूर्वक हल्ला केल्याचे समोर आले आहे. यामध्ये पूर्वनियोजित पॅटर्न दिसतोय”
इतकेच नव्हे तर, नुकताच प्रदर्शित झालेला छावा चित्रपटाचा उल्लेख करत “”छावा या चित्रपटाने छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास आपल्यासमोर आणला. त्यामुळे राज्यातील लोकांच्या भावना प्रज्वलित झाल्या आहेत. औरंगजेबाविषयी असणारा राग समोर येतो आहे.,” असे देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रीया
दरम्यान, या सर्व मुद्यावर भाष्य करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “औरंगजेब हा महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे. त्यामुळे काही लोक हा कलंक पुसून टाकण्यासाठी काही लोक आंदोलन करत आहेत. ते चुकीचं नाहीये. औरंगजेबाने अन्याय केला, जुलूम केला आणि त्याचं उदात्तीकरण करणं महाराष्ट्र सहन करणार नाही. महाराष्ट्र अशा लोकांना माफ करणार नाही.”