Namdeo Dhasal : नामदेव ढसाळ यांचा झंझावात मोठ्या पडद्यावर झळकणार; सिनेमाचे पहिले पोस्टर रिलीज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Namdeo Dhasal) द बायोस्कोप फिल्म्सने महान बंडखोर कवी आणि दलित पँथर चळवळीचे संस्थापक नामदेव ढसाळ यांच्या जीवनावर आधारित बायोपिक सिनेमाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाचे नाव ‘ढसाळ’ असून निर्मितीचे सर्व अधिकार त्यांच्या कुटुंबाकडून अधिकृतपणे घेण्यात आले आहेत. एकूण २ वर्षांच्या अत्यंत सखोल संशोधन आणि अभ्यासानंतर हा चित्रपट ढसाळ यांच्या प्रभावी तसेच प्रेरणादायी जीवनाचा वेध घेण्यास तयार होतोय. संजय पांडे निर्मित, वरुणा राणा लिखित- दिग्दर्शित, प्रताप गंगावणे यांच्या संवादांसह हा बायोपिक मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. ढसाळ यांच्या अन्याय आणि शोषणाविरुद्धच्या संघर्षाचे वास्तववादी चित्रण यामध्ये करण्यात येणार आहे.

‘ढसाळ’ या चित्रपटाची निर्मिती सप्टेंबर २०२४ मध्ये सुरू होऊन २०२५ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. निर्माते संजय पांडे चित्रपटाविषयी बोलताना म्हणाले की, ‘पद्मश्री नामदेव ढसाळ म्हणजे वादळ. सोशीत आणि अन्यायाने पीडलेल्या दलित समाजाला नवसंजीवनी देणारा, शब्दात विद्रोहाची आग असलेला पॅंथर, महाराष्ट्राच्या साहित्याला ग्लोबल करणारा पहिला कवी. (Namdeo Dhasal) त्यांचं जीवन चरित्र म्हणजे एक ज्वलंत मशाल आहे’.

‘महाराष्ट्रच काय संपूर्ण देशात दलित पॅंथरने एक राजकीय व सामाजिक वादळ तयार केलं होतं. त्यांच्या जीवनावर चित्रपट करणे हे एक निर्माता म्हणून माझं सौभाग्य आहे आणि आव्हान ही आहे. पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या सर्व देश विदेशातील चाहत्यांसाठी, विद्यार्थी आणि कार्यकर्ते यांच्यासाठी ही पर्वणी असेल’.

लेखक आणि दिग्दर्शिका वरुणा राणा यांनी चित्रपटाचे महत्त्व व्यक्त करत म्हटले की, ‘काही गोष्टी ह्या सांगायलाच पाहिजे कारण त्या आपल्याला विचार करण्यास भाग पाडतात. ढसाळ यांचे जीवन ही अशीच एक कथा आहे. खेडेगावातील महारवाड्यात जन्मलेल्या, मुंबईतील कामाठीपुरा येथे बालपण गेलेल्या ढसाळांनी जागतिक पातळीवर आपल्या कवितेचा ठसा उमटविला. त्यांच्या कट्टर दलित पँथर चळवळ आणि त्यांच्या बंडखोर कवितेतून त्यांनी दलित आणि गरिबांच्या हक्कांसाठी अथक लढा दिला’. (Namdeo Dhasal)

‘ढसाळ हे व्यक्तीपेक्षा एक जास्त शक्तिशाली, प्रक्षोभक विचार होता आणि हा विचार मला आव्हानात्मक वाटला म्हणून तो तमाम लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी एक चित्रपट दिग्दर्शक म्हणून माझे त्याला प्राधान्य राहील. जातीच्या फिल्टर शिवाय त्यांचे विचार हे सर्व समाजाच्या अंतःकरणाला थेट भिडू शकतात कारण हे विचार कालातीत आहेत’.

(Namdeo Dhasal) नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांनी चित्रपटाविषयी प्रतिक्रिया देत म्हटले की, ‘आज १५ फेब्रुवारी नामदेवचा जन्मदिवस..दहा वर्षे झाली नामदेव ढसाळ नावाचा झंझावात शांत झाल्याला. नामदेवच समग्र कलंदरपण, विचारीपण, कविमन आणि माणसांप्रती असलेला प्रचंड जिव्हाळा या साऱ्या गोष्टी आपल्याला त्यांच्या ढसाळ चित्रपटातून दिसून येईल’.

‘या चित्रपटात नामदेवच नाही तर त्याच्या समग्र जीवनाबरोबरच त्यावेळची क्रांतिकारक परिस्थिती, त्यावेळचं राजकारण, पूर्ण दलित पँथर ची दहशत असलेली चळवळ असं सर्वांगीण समाजाचाच लेखाजोगा उभा राहील. त्याची बायोपिक हे फक्त वरुणाजींचं स्वप्नच नाही तर हा एक महत्वाचा ऐतिहासिक ‘बखरनामाच’आहे. एका महान लोकनायकाच्या जीवनावर चित्रपट बनविण्याच्या वरुणाजींच्या या महत्वाकांक्षेला माझ्या खूप शुभेच्छा आणि त्यांच्या अभ्यासपूर्ण कष्टांना व तळमळीला कडक सॅल्युट!’ (Namdeo Dhasal)