Thursday, March 30, 2023

नामदेव ढसाळांची कविता आग लावते ?? काय आहे एल्गार परिषदेनंतरचं धक्कादायक वास्तव ??

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगलीला पुण्यातील शनिवारवाडा येथे झालेली एल्गार परिषद कारणीभूत असल्याची माहिती तपास यंत्रणा देत आहेत. यानुसार शहरी नक्षलवादाचा ठपका ठेवून अनेक बुद्धिवादी विचारवंतांना अटकही करण्यात आली होती. शरद पवार यांनी महाविकासआघाडीचं सरकार सत्तेत आल्यानंतर या प्रकरणाचा चांगलाच धांडोळा घ्यायला सुरुवात केली आहे. तपास एनआयएकडे देणं, एसआयटी चौकशी लावणं हा सगळा खटाटोप मागील महिनाभरात सुरु असल्याचं पाहायला मिळाल्यानंतर एल्गार परिषदेप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सामाजिक कार्यकर्त्याबाबत एक धक्कादायक खुलासा शरद पवार यांनी केला आहे.

सुधीर ढवळे या सामाजिक कार्यकर्त्याने पद्मश्री नामदेव ढसाळ यांची ‘रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांनो’ ही कविता परिषदेवेळी सादर केल्याने त्यांना अटक करण्यात आल्याचं शरद पवारांनी सांगितलं.

- Advertisement -

काय आहे कविता?

रक्तात पेटलेल्या अगणित सुर्याँनो
तूमची आय-बहीण आजही विटंबली जाते
हाटाहाटातून…

मवाल्यासारखे माजलेले उन्मत्त नीरो
आजही मेणबत्तीसारखी जाळतात
माणसं चौकाचौकातून…

कोरभर भाकरी पसाभर पाणी
यांचा अट्टाहास केलाच तर
आजही फीरवला जातो नांगर
घरादारावरून…

चिँदकातले हात सळसळलेच तर
छाटले जातात आजही नगरानगरातून
रक्तात पेटलेल्या अगणित सुर्याँनो,
किती दिवस सोसायची ही
घोर नाकेबंदी मरेपर्यँत राहयचं का असंच युद्धकैदी?

ती पाहा रे ती पाहा मातीची अस्मिता आभाळभर झालीय
माझ्या यातनेनं आता झिँदाबादची गर्जना केलीय,
रक्तात पेटलेल्या अगणित सुर्याँनो, आता या शहराशहराला
आग लावत चला …
आग लावत चला …

या कवितेतील शेवटच्या दोन ओळींत आग लावत चला हे शब्द आहेत. याचाच संदर्भ घेत पोलिसांनी ढवळे यांना अटक केली असल्याचं पवार म्हणाले आहेत. महाकवी नामदेव ढसाळ यांच्या ‘गोलपीठा’ या कवितासंग्रहाला राज्य सरकारने पुरस्कारही दिला होता. त्याच कवितासंग्रहातील ही कविता आहे.