पंजाबच्या घटनेमागे केंद्रीय गृहमंत्र्यांचा तर हात नाही ना?; पटोलेंचा थेट गंभीर आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आंदोलनकर्त्यामुळे १५- २० मिनिटे एका जागी अडकून राहावे लागले. यावरून देशातील राजकिय वातावरण चांगलेच तापले असून राजकिय पक्ष एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप करत आहेत. दरम्यान, या घटनेवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा या घटनेमागे हात असल्याचा आरोप करीत शंका व्यक्त केली आहे. पंजाबच्या घटनेमागे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा हात तर नाही ना?, असा गंभीर आरोप पटोले यांनी केला आहे.

नाना पटोले यांनी आज पत्रकार परिषद घेऊन हा गंभीर आरोप केला आहे. यावेळी ते म्हणाले, पंतप्रधानांचा दौरा असतो तेव्हा 15 दिवसांपूर्वीपासून सर्व सुरक्षेच्या व्यवस्था पाहिल्या जातात. तीन गुप्तचर यंत्रणांकडून माहिती घेतली जाते. एसपीजी या सर्वांचे कंट्रोल करत असते. एसपीजी गृहखात्यांतर्गत येते. अमित शहा हे या यंत्रणांचे प्रमुख आहेत. त्यामुळे या घटनेमागे अमित शहांचा हात तर नाही ना हा प्रश्न आहे. देशाच्या गृहमंत्र्यांनीच त्याचे उत्तर दिले पाहिजे. असे करून काही डाव तर साधायचा नव्हता ना हेही सांगितले पाहिजे.

पाच राज्यात निवडणुका जिंकण्यासाठी नौटंकी सुरू आहे. भाजप जनतेचे प्रश्न, महागाई बेरोजगारी जनतेचे प्रश्न यावरील विषय डायव्हर्ट करण्यासाठी या पद्धतीने काम करत असते. पंतप्रधान रोज अनेक रुप बदलत असतात. त्या पद्धतीने आजही त्यांनी तेच केले. पंजाबमध्ये रिकाम्या खुर्च्या होत्या म्हणून नौटंकी सुरू असेल. या प्रकरणी पंजाब सरकारने अधिकाऱ्यांच्या माध्यमातून चौकशी सुरू केली आहे. त्यातून दूध का दूध पानी का पानी व्हावे, असेही यावेळी पटोले यांनी सांगितले.