गद्दारांवर थेट कारवाई करणार, विधानपरिषदेत मते फुटल्याने नाना पटोले आक्रमक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधानपरिषद निवडणुकीत (Vidhan Parishad Election 2024) काँग्रेसची मते फुटल्याने महाविकास आघाडीचे उमेदवार जयंत पाटील यांचा पराभव झाला. काँग्रेसची मते योग्य रीतीने त्यांच्याकडे ट्रान्सफर न झाल्याचा फटका जयंत पाटलांना बसला. काँग्रेसची एकूण ३७ मते होती, मात्र त्यातील ८ मते फुटल्याचे स्पष्ट झालं आहे तर दुसरीकडे अजित पवार गटानेच यातील ५ मते फोडल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. या एकूण सर्व प्रकारानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) चांगलेच आक्रमक झालेत. ज्या कोणी आमदारांनी गद्दारी केली ते आम्हाला समजलं आहे. पक्ष त्यांच्यावर थेट कारवाई करेल असा इशारा नाना पटोले यांनी दिला आहे

प्रसारमाध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले, मागच्या विधानपरिषद निवडणुकीतही असाच प्रकार घडला होता. त्यावेळी काही बदमाश आमदारांनी क्रॉस व्होटींग केलं होतं. मात्र तेव्हा ते आमदार कोण होते? याचा पत्ता लागला नव्हता. यावेळी आम्ही व्यूरचना आखली होती. या व्यूरचनेत काही बदमाश आमदार अडकले आहेत. त्यांच्याबाबत आम्ही वरिष्ठांना माहिती दिली आहे. ज्या आमदारांनी पक्षाच्या विरोधात काम केलं आहे, अशा लोकांना लवकरच बाहेरचा रस्ता दाखवला जाईल. अशा विश्वासघातकी आणि गद्दार लोकांना काँग्रेस पक्षातून बाहेर काढलं जाईल. त्यांच्यावर अशी कारवाई केली जाईल की पुन्हा कुणी तसं कृत्य करण्याची हिंमत करणार नाही अशी माहिती नाना पटोले यांनी दिली.

मते नेमकी फुटली कुठं?

काँग्रेसकडून फक्त प्रज्ञा सातव या एकमेव उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होत्या. पण त्यांचे ३७ आमदार आहेत. प्रज्ञा सातव २५ मतांनी विजयी झाल्या. त्यामुळे काँग्रेसची १२ मते शिल्लक होती. दुसरीकडे उद्धव ठाकरेंचे १५ आमदार असताना मिलिंद नार्वेकरांना पहिल्या पसंतीची २२ मतं मिळाली होती. पण एका मतासाठी त्यांना दुसऱ्या पसंतीच्या मतांवर अवलंबून राहावं लागलं. प्रज्ञा सातव यांच्या दुसऱ्या पसंतीची ३ मते मिलिंद नार्वेकरांना पडली आणि ते विजयी झाले. मात्र उर्वरित मते महाविकास आघाडीचेच उमेदवार असलेल्या जयंत पाटलांना मात्र मिळाली नाहीत. जयंत पाटील याना फक्त १२ मते पडली, ती सुद्धा शरद पवारांच्या आमदारांचीच … बाकी मतांची जुळवाजुळव झाली नाही. याउलट अजित पवारांकडे ४२ आमदारांचे संख्याबळ असताना त्यांच्या दोन्ही उमेदवारांना मिळून ४७ मते मिळाली. म्हणजेच दादा गटाला ५ मते जास्त मिळाली ती काँग्रेसची आहेत असं बोलल जातंय.