भूस्खलनातील बाधितांना शासनामार्फत पूर्ण मदत केली जाईल – नाना पटोले

वाई तालुक्यातील बाधी गावांचा दौरा

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके

सातारा जिल्ह्यातील वाई, महाबळेश्वर, जावळी व पाटण तालुक्यातील अनेक दुर्गम भागातील गावात अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. या गावात प्रशासनाच्यावतीने मदतकार्य केले जात आहे. दरम्यान, यातील वाई तालुक्याचा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भेट देत दौरा केला. यावेळी त्यांनी बाधीत लोकांना शासनामार्फत पूर्ण मदत करण्यात येईल तसेच मदत व पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार हे पुढील काही दिवसात पाहणी करतील, असे आश्वासनही दिले.

अतिवृष्टीचा फटका हा सातारा जिल्ह्यातील अनेक दुर्गम भागातील गावांना बसला आहे. अनेक ठिकाणी भूस्खलन झाले असून घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील कोंढावळे येथील देवरुखवाडीत गुरुवारी भूस्खलनाची घटना घडली असून यात पाच घर मातीच्या ढिगाऱ्याखाली गेली आहे. परिसरातील नागरिकांनी 27 नागरिकांना सुखरूप बाहेर काढले असून अजूनही 2 महिला बेपत्ता झाल्या आहेत.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वाईच्या पश्चिम भागातील वाई येथील जांभळी, कोंढावळे, देवरुखवाडी या गावांना भेटी देत तेथील नुकसानीची पाहणी केली. तसेच वेलंग येथे तहसीलदार रणजीत भोसले व कॉंग्रेस कार्यकर्त्यांकडून परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्यासोबत वाई विधानसभा युवक कॉंग्रेस अध्यक्ष जयदीप शिंदे, सातारा जिल्हा सेवादलाचे अध्यक्ष प्रतापसिंह देशमुख, वाई तालुका काँग्रेसचे अध्यक्ष रवी भिलारे, युवक काँग्रेस वाई तालुका अध्यक्ष प्रमोद अनपट, वाई विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष सचिन काटे व कार्यकर्ते उपस्थित होते.

दरम्यान, वाई शहर व तालुक्यातून मदतीचा ओघ सुरु झाला आहे. यशोधन ट्रस्ट मार्फत रवि बोडके, निवृत्ती पाटील व रफिक शेख, प्राथमिक शिक्षक मदत समूह वी यांच्यातर्फे भास्कर पोतदार, कम्युनिटी किचन, स्वप्नील गायकवाड, प्रा. नितीन कदम हे जेवण व इतर मदत घेऊन घटनास्थळी गेले आहेत.

You might also like