नांदेड : जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीसाठी आज मतदान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नांदेड : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २१ संचालक पदासाठी आज जिल्ह्यातील १५ केंद्रांवर मतदान होणार आहे. या निवडणुकीत ४३ उमेदवार रिंगणात असून २१ संचालकांपैकी ३ संचालक हे बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामध्ये काँग्रेस, शिवसेना व भाजपच्या प्रत्येकी एका उमेदवाराचा समावेश आहे . विशेष म्हणजे भाजपच्या उमेदवाराने प्रतिस्पर्धी असलेल्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मतदानाच्या दोन दिवस आगोदर पाठिंबा दिला आहे. 23 मार्च ही अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख होती.

उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यानंतर २१ पदांसाठी ४३ उमेदवार रिंगणात राहिले. त्यात काँग्रेसचे बाळासाहेब पाटील – रावणगावकर , भाजपचे भास्करराव पाटील खतगावकर आणि शिवसेनेचे नागेश पाटील – आष्टीकर हे उमेदवार बिनविरोध निवडून आले . बँकेच्या इतर सहकारी संस्था व व्यक्ती सभासद मतदारसंघातून राष्ट्रवादीचे मोहन पाटील – टाकळीकर यांना त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले भाजपचे व्यंकटेश जिंदम यांनी पाठिंबा दिल्याने टाकळीकर यांच्या विजयाचा मार्गही मोकळा झाला आहे . या निवडणुकीत पालकमंत्री अशोक चव्हाण आणि खा . प्रताप पाटील – चिखलीकर यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे . प्रारंभी ही निवडणूक बिनविरोध काढण्याचे प्रयत्न झाले झाले होते . महाविकास आघाडी प्रणीत समर्थ विकास पॅनेल विरुद्ध भाजप प्रणीत सहकार विकास पॅनेलमध्ये बँकेवर सत्ता मिळविण्यासाठी संघर्ष सुरू आहे .

हे मतदान सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत होणार असून, यासाठी जिल्ह्यात १५ केंद्रे राहणार आहेत . हिमायतनगरचे मतदान केंद्र आता हदगावला जोडण्यात आले आहे. तेथे केवळ एकच मतदार असल्याने हा बदल करण्यात आला असल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितले. तहसीलदार हे मतदान केंद्राध्यक्ष म्हणून काम पाहणार आहेत, तर नायब तहसीलदार व इतर अधिकारी हे मतदान अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. जवळपास १०० ते ११० अधिकारी, कर्मचारी या निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आले आहेत . मतदार हा कोरोना पॉझिटिव्ह असला तरी मतदाराला मतदानाची संधी दिली जाणार आहे. त्यासाठी अर्धा तासाचा वेळ आहे .

Leave a Comment