हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । शंकरराव चव्हाण यांनी जपलेला वारसा त्यांचे पुत्र आणि काँग्रेसच्या पहिल्या फळीतील ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) हे अखेर फुटले… आणि ते भाजपवासी झाले…काँग्रेस पक्षाशी इमान आणि एकनिष्ठता बाळगून जे काही हातावर मोजण्याइतके नेते पक्षात राहिले होते त्यात चव्हाणाचं नाव प्राधान्यानं घेतलं जातं.. संयमी नेतृत्व, प्रशासनावर असणारी पकड आणि काँग्रेस हायकमांडचा असणारा विश्वास त्यामुळे चव्हाण राज्यातील इतर नेत्यांपेक्षा पक्षामध्ये उजवे ठरत होते. मात्र मुख्यमंत्री पदावर असताना आदर्श घोटाळ्यानं त्यांच्या राजकीय कारकीर्दीला उतरती कळा लागली. त्यानंतर मागील काही काळापासून त्यांच्या पक्ष फुटीच्या वावड्या अनेकदा उठल्या. मात्र लोकसभा निवडणुकीचं टाइमिंग साधत त्यांनी भाजपात प्रवेश केला आणि राज्यसभेची खासदारकीही मिळवली.
चव्हाणांच्या जाण्यानं राज्यातील काँग्रेसला मोठं भगदाड पडलं आहे. नेत्यांसह कार्यकर्त्यांसाठीही ही घटना मॉरल डाऊन करणारी नक्कीच असू शकते. पण याचा सर्वात जास्त इम्पॅक्ट पडणार आहे तो म्हणजे नांदेड लोकसभा मतदारसंघावर…अगदी 2014 च्या मोदी लाटेत राज्यातून काँग्रेसचा सुपडा साफ झालेला असताना अवघ्या एका जागेवर काँग्रेसला विजय मिळवता आला होता ती हीच नांदेडची जागा… नांदेड म्हणजे काँग्रेस आणि काँग्रेस म्हणजे नांदेड (Nanded Lok Sabha) . नांदेडच्या जनतेनं काँग्रेसवर जीवापाड प्रेम केलं आणि काही अपवाद वगळता नेहमीच पंजाच्या उमेदवाराला खासदारकी मिळवून दिली. या सगळ्यामागे अशोक चव्हाण आणि त्यांच्या भल्या मोठ्या यंत्रणेचा हात आहे हे आपण नाकारून चालणार नाही. पण त्याच चव्हाणांचा 2019 च्या निवडणुकीत भाजपाच्या उमेदवाराकडून पराभव झाला. हा काँग्रेससाठी सर्वात मोठा धक्का होता. मात्र आता महाविकास आघाडी एकत्र लढत असल्यानं हा हक्काचा बालेकिल्ला पुन्हा आपल्याकडे खेचून आणण्यासाठी सगळी तयारी झालेली असताना या खेळातला म्होरक्याच भाजपात गेल्यानं आता काँग्रेसची (Congress) आणि पर्यायानं महाविकास आघाडीची चांगलीच गोची झालीय. चव्हाणांच्या जाण्यानं नांदेड लोकसभेचं गणित कितपत बदललंय? तिकीट वाटपापासून ते मतांची जुळवाजुळव करण्यासाठी आघाडी आणि युतीचा नांदेडचा मास्टर प्लॅन नक्की आहे तरी काय? तेच जाणून घेणार आहोत.
नांदेडमध्ये 2019 च्या निवडणुकीत अशोक चव्हाण यांचा पराभव होईल अशी शक्यता अनेक राजकीय विश्लेषकांनी आधीच व्यक्त केली होती. याची काही कारणही सांगितली जातात चव्हाणांना स्वत:लाच निवडणूक लढवण्याची इच्छा नव्हती. दुसरं म्हणजे अशोक चव्हाण यांच्या पराभवामागे वंचित बहुजन आघाडीची (Vanchit Bahujan Aghadi) प्रमुख भूमिका आहे. कारण नांदेडमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या यशपाल भिंगे यांना लाखाहून अधिक मतं मिळाली आहेत. चव्हाण आणि चिखलीकर यांच्या मतांमधील फरकही फारच कमी आहे. प्रकाश आंबेडकर, असदुद्दीन ओवेसी, अबू आझमी, गुलाब नबी आझाद यांच्या सभांनी 2019 मध्ये नांदेडच्या राजकारण भलतंच तापवलं होतं.
मात्र यंदा परिस्थिती फारशी वेगळी आहे. महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी थेट लढत होणार आहे. त्यात अशोक चव्हाण भाजपात गेल्यानं तिकीट कुणाला मिळणार? याचा मोठा प्रश्न आघाडीतील काँग्रेसला ऐन निवडणुकीच्या तोंडावर पडलेला असणार आहे . त्यामुळे यंदा महाराष्ट्राच्या ज्या काही ठराविक जागांवर सगळ्यांच्याच नजरा खिळून राहिलेल्या असणार आहेत त्यात नांदेड चा नंबर क्रमांक एकवर असेल.
दुसरीकडे राज्यातील 48 पैकी ज्या 13 सीटवर भाजपचा उमेदवार निवडून येईल का नाही? याबाबत पक्षातील वरिष्ठ नेत्यांमध्येच साशंकता आहे. त्यात नांदेड लोकसभा मतदारसंघाचाही समावेश होतो. अशोक चव्हाण यांना तर आधीच राज्यसभेवर पाठवण्यात आलंय. त्यामुळे आता विद्यमान खासदार चिखलीकरांच्या ऐवजी भाजप नक्की कोणता चेहरा समोर करणार? की युतीतील मित्रपक्षांना ही जागा सोडणार? हे पहा ना येत्या काळात इंटरेस्टिंग ठरणार आहे