Friday, June 2, 2023

पवारसाहेब, दाऊद आमचा कोणी दोस्त वगैरे नव्हता; राणेंचं प्रत्युत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या भाजपने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक झाल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी का केली नाही असा सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केल्यानंतर नारायण राणे यांनी देखील पवारांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. पवारसाहेब, आमचा कोणी दाऊद दोस्त वगैरे नव्हता, अस म्हणत हीच तर तुमची पुण्याई अस म्हणत थेट पवारांवरच हल्लाबोल केला. ते मालवण पोलीस स्टेशन बाहेर पत्रकारांशी संवाद साधत होते.

नारायण राणे म्हणाले, वा… पवार साहेब, काय बोलावं की कीव करावी या वाक्यावरून आपली मला कळत नाही. आमचा कोणी दाऊद दोस्त नाही आमचा कधी संबंध आला नाही. तो देशद्रोही आहे आमचे हजारो लोक बॉम्बस्फोटात मारले आहेत. त्या दाऊदशी नवाब मलिकचे संबंध आहेत म्हणून त्याला अटक झाली, म्हणून आम्ही राजीनाम्याची मागणी करत आहोत. तुम्ही आमचे राजीनामे मागताय, हेच तर केलं आयुष्यभर हीच तर तुमची पुण्याई आहे.

यावेळी त्यांनी सुशांत सिंह आणि दिशा सालीयन मृत्यू प्रकरणी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांवर टीका केली. सुशांतच्या हत्येनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला दोन वेळा फोन केला अन् ते म्हणाले की आपण सुशांत आणि दिशाच्या याप्रकरणी तुम्ही काहीही बोलू नका. एका मंत्र्याची गाडी होती अस बोलू नका. तुम्हालाही मुले आहेत. मात्र पोलिसांनी माझ्या स्टेटमेंट मधून हे वगळले आहे असे राणेंनी म्हंटल.