मातोश्रीत बसून धमकीची भाषा षंढच करू शकतो; राणेंचा ठाकरेंवर प्रहार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणुकीत असा लढलो कि नरेंद्र मोदींना घाम फोडला अशा शब्दात शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मोदींवर निशाणा साधल्यानंतर भाजप खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी उद्धव ठाकरेंचा जोरदार समाचार घेतला आहे. नरेंद्र मोदी यांच्याब‌द्दल हे वाक्य उदगारताना जनाची नाही तर मनाची तरी ठेवावी असं म्हणत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. तसेच आपल्या अडीच वर्षाच्या कालावधीत विकासाच्या बाबतीत महाराष्ट्र १० वर्ष मागे गेला तेव्हा लोक म्हणायचे अडीच वर्षात दोनदा मंत्रालयात जाणाऱ्या मुख्यमंत्र्याची कीव करावीशी वाटते असेही राणेंनी म्हंटल. याबाबत नारायण राणे यांनी थेट ट्विट केलं आहे.

काय आहे राणेंचं ट्विट ?

नारायण राणे आपल्या ट्विटमध्ये म्हणतात कि, उद्धव ठाकरे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चॅलेंज देण्याची औकात आणि लायकी नाही. लोकशाहीमध्ये निवडणुकीत जागा कमी-जास्त होतात. भाजपने काही पहिल्यांदा निवडणूक लढलेली नाही. नरेंद्र मोदी अनेक निवडणुकांना सामोरे गेलेले आहेत. त्यामुळे त्यांना घाम फुटण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. नरेंद्र मोदी यांच्याब‌द्दल हे वाक्य उदगारताना जनाची नाही तर मनाची तरी ठेवावी. उद्धव वाकड्‌यात शिरले तर वाकडे पणाला चोख उत्तर देवून भाजप सरळ केल्याशिवाय राहणार नाही. राजकारणातील माणसे षंड आहेत, असे आपण म्हणालात. आपण आत्मपरीक्षण करा, षंढ शब्दाचा अर्थ कोणाशी जवळीक साधतो? आपले मुख्यमंत्री पद हे महाराष्ट्रासाठी कलंक होते. आपल्या अडीच वर्षाच्या कालावधीत विकासाच्या बाबतीत महाराष्ट्र १० वर्ष मागे गेला तेव्हा लोक म्हणायचे अडीच वर्षात दोनदा मंत्रालयात जाणाऱ्या मुख्यमंत्र्याची कीव करावीशी वाटते”,असा घणाघात राणेंनी केला .

“काही झाले तरी आपले स्वप्न आम्ही पुरे होवू देणार नाही. भविष्यकाळात महाराष्ट्रात कोण राहील हे महाराष्ट्राची जनता ठरवेल. स्वत:चे कौतुक करून घेवून आपण अडीच वर्षात भीम पराक्रम केल्याच्या फुशारक्या मारत आहात त्याला लवकरच चोख उत्तर देऊ. एक लक्षात ठेवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकटे नाहीत. आम्ही त्यांच्यासोबत आहोत. भाजप आणि आर.एस.एस. त्यांच्या सोबत आहे. मातोश्रीत बसून धमकीची भाषा षंढच करू शकतो अशा शब्दात नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला.

ठाकरेंनी काय टीका केली होती?

मुंबईतील रंगशारदा सभागृहात झालेल्या ठाकरे गटाच्या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांच्यासहित भाजपवर तुफान हल्लाबोल चढवला होता. उद्धव ठाकरे म्हणाले, अनिल देशमुखांनी सांगितलं की, कसं मला आणि आदित्यला तुरुंगात टाकण्यासाठी या फडणवीसाचे डाव होते. हे सगळं सहन करुन मी हिंमतीने उभा राहिलेलो आहे. आता एकतर तू तरी राहशील नाहीतर मी तरी राहीन. जोपर्यंत आपण सरळ होतो, तोपर्यंत सरळ असतो. पण एकदा वाकड्यात घुसलो की आपण वाकडं करतो. लोकसभा निवडणुकीत आपण असा नडलो की मोदींना घाम फोडला. नरेंद्र मोदींचे भाषण बघताना आता किव येते असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मोदी आणि फडणवीसांवर तोफ डागली आहे.