हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोकणवासीयांसाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. तब्बल 20 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आजपासून सिंधुदुर्गातील नव्या ‘चिपी परुळे’ विमानतळावरून प्रवासी विमान सेवा सुरु होत आहे. आज त्याचा उद्घाटन कार्यक्रम असून त्यानिमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह दिग्गज नेतेमंडळी उपस्थित होती.
यावेळी नारायण राणे आणि अजित पवार यांनी एकाच वेळी एकमेकांना नमस्कार घातला. बाळासाहेब थोरात आणि राणेंनीही एकमेकांना नमस्कार घातला. पण ना उद्धव ठाकरेंनी राणेंकडे बघितलं ना राणेंनी उद्धव ठाकरेंकडे पाहिलं. एकंदरितच तेरे भी चुप-मेरे भी चुप असा प्रसंग उपस्थितांनी अनुभवला.
खर तर उद्धव ठाकरे आणि नारायण राणे जवळपास 16 वर्षांनी एकाच मंचावर येत आहेत. दरम्यानच्या काळात त्यांच्यातलं राजकीय वैर संपूर्ण महाराष्ट्राने अनुभवलं. पण आज राणे-ठाकरे आपल्यातल्या वाद बाजूला ठेऊन एकमेकांना बोलतील, चर्चा करतील. कमीत कमी एकमेकांना पाहून नमस्कार तरी करतील, अशी शक्यता होती. पण तसं काहीच झालं नाही.